दर्शनाकरिता लांबच लांब रांगा, दररोज संध्याकाळी सुश्राव्य कीर्तन व महाप्रसाद
चिंचवड : ज्या हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांनी १५ एप्रिल १६४५ रोजी ज्या रायरेश्वराच्या शिवलायात करंगळी कापून स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली, त्या रायरेश्वराची प्रतिष्ठापना कृष्णानगर, चिंचवड येथे १९९८ मध्ये करण्यात आली आहे. कृष्णानगर येथील रायरेश्वराचे हे मंदिर महाराष्ट्रातील दुसरे ऐतिहासिक मंदिर आहे. या रायरेश्वर प्रतिष्ठानतर्फे महाशिवरात्र उत्सवानिमित्त दरवर्षी विविध विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येतात. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी महाशिवरात्र उत्सवाची सुरुवात शिवजंयतीच्या कार्यक्रमाने करून यात विविध कार्यक्रमांचे आयोजन रायरेश्वर प्रतिष्ठान कृष्णानगर येथे आयोजित करण्यात आले आहे, अशी माहिती रायरेश्वर प्रतिष्ठानचे अध्यक्ष शशिकांत भैरवकर यांनी दिली. आज महाशिवरात्र निमित्त देशभरातील भक्त आपल्या आसपासच्या महादेवाच्या मंदिरात दर्शनाकरिता येतात.
चिंचवडमधील कृष्णानगर येथे सुद्धा रायरेश्वराच्या मंदिरात आज सकाळपासूनच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. या भाविकांना सुरक्षा देण्यासाठी स्थानिक पोलिसांनी सुद्धा इथे हजेरी लावून चोख बंदोबस्त ठेवला होता. दरम्यान एक सामाजिक बांधिलकी म्हणून रायरेश्वर प्रतिष्ठानच्यावतीनं पोलीस अधिकारी आणि कर्मचारी बांधवांचा सत्कार यावेळी करण्यात आला. याठिकाणी सकाळपासूनच भक्तिमय वातावरण दिसून येत होत. या भागातील महिला भजनी मंडळींनी भजनरुपी सेवा सादर केली.
आजपासून पुढील २ दिवस महाशिवरात्र उत्सव चालणार आहे. या उत्सवानिमित्त दररोज सायंकाळी ७ वाजेपासून रात्री ९ वाजेपर्यंत सुश्राव्य कीर्तन आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये दि. २१ फेब्रुवारी रोजी ह.भ.प. संतोष महाराज काळोखे विठ्ठलवाडी, देहूगाव यांचे सुश्राव्य कीर्तन, २२ फेब्रुवारी रोजी विनोदाचार्य ह.भ.प. नरेंद्र महाराज गुरव मालेगांवकर यांचे सुश्राव्य कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे, तरी या कार्यक्रमाचा लाभ आसपासच्या नागरिकांनी घ्याव्या, अशी विनंती रायरेश्वर प्रतिष्ठानाच्या वतीनं अध्यक्ष शशिकांत भैरवकर, उपाध्यक्ष केशव ढेकणे व विश्वस्त बापू सोनावणे आणि विश्वस्तांनी केली आहे.