Site icon साप्ताहिक एकच ध्येय

एमआयएम वारिस पठाण यांच्याकडून स्पष्टीकरण मागवणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी एमआयएम वारिस पठाण यांच्याकडून स्पष्टीकरण मागवणार आहे. पक्षाचे खासदार इम्तियाज जलील यांनी ही माहिती दिली आहे. अशा प्रकारच्या वक्तव्यांना पक्षाचा पाठिंबा नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. गरज पडल्यास पक्षाच्या कार्यकर्त्यांनी काय बोलावे आणि काय बोलू नये यासाठीची मार्गदर्शक तत्वे जाहीर करू असेही इम्तियाज जलील यांनी यावेळी स्पष्ट केले.

एमआयएमचे नेते वारिस पठाण यांनी कर्नाटकमधे केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी उदारमतवादी मौन का बाळगून आहेत, असा प्रश्न भाजपानं उपस्थित केला आहे. नागरिकत्व सुधारणा कायद्याला विरोध करण्याच्या नावाखाली कशा प्रकारचे कारस्थान सुरु आहे. हेच पठाण यांच्या वक्तव्यावरुन दिसून येत असल्याचं भाजपानं म्हटलं आहे.

पक्षाचे प्रवक्ते सांबित पात्रा यांनी आज दिल्लीत यासंदर्भात पत्रकार परिषद घेतली. पठाण यांचं वक्तव्य हिंसेला उत्तेजन देणारं आणि दोन समुदायांमधे फूट पाडणारं असल्याचं सांगून भाजपा युवा मोर्चाच्या एका कार्यकर्त्यानं पुणे पोलिसांकडे काल तक्रार दाखल केली.

एमआयएम आणि भाजप या एकाच नाण्याच्या दोन बाजू असून एमआयएम भाजपच्या इशा-यावर धार्मिक ध्रुवीकरणाचा अजेंडा राबवत असल्याचं  वेळोवेळी स्पष्ट झालं आहे, अशी टीका काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे. कट्टरता ही कोणत्याही धर्माची असली तरी ती देशासाठी घातकच आहे असं सांगत एमआयएम आणि भाजप या दोघांचाही निकरानं  विरोध झाला पाहिजे, असं ते म्हणाले.

Exit mobile version