Site icon साप्ताहिक एकच ध्येय

17व्या लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनाच्या प्रारंभी पंतप्रधानांनी प्रसारमाध्यमांसमोर केलेले निवेदन

नवी दिल्ली : नमस्कार मित्रांनो, निवडणुकांच्या नंतर नव्या लोकसभेच्या स्थापनेनंतर आज पहिले अधिवेशन सुरू होत आहे. संसदेत आलेल्या अनेक नव्या सहकाऱ्यांची ओळख होण्याची संधी आहे आणि जेव्हा नवे सहकारी आपल्या सोबत येतात तेव्हा त्यांच्यासोबत नवा उत्साह, उमेद आणि नवी स्वप्न जोडली जातात. भारताच्या लोकशाहीचे वैशिष्ट्य काय आहे? तिची ताकद काय आहे? या अनुभव आपल्याला प्रत्येक निवडणुकीत येतो. स्वातंत्र्यानंतर या लोकसभेत पहिल्यांदाच सर्वात जास्त मतदान झाले आहे. तसेच सर्वाधिक महिला प्रतिनिधी निवडून आल्या आहेत. आधीच्या तुलनेत महिलांच्या मतदानाच्या प्रमाणात प्रचंड वाढ झाली आहे, अशी अनेक वैशिष्ट्य या निवडणुकीची आपल्याला सांगता येतील. कित्येक दशकांनंतर एका सरकारला पुन्हा पूर्ण बहुमताने आणि पहिल्यापेक्षा अधिक जागा देत जनतेने सेवा करण्याची संधी दिली आहे. गेल्या पाच वर्षातला आमचा अनुभव असा आहे की जेव्हा अधिवेशनात कामकाज झालं तेव्हा ते अतिशय निकोप वातावरणात झालं आणि देशहितासाठी अत्यंत महत्त्वाचे निर्णयही त्यावेळी घेतले गेले. त्या अनुभवाच्या आधारावरच या पुढच्या पाच वर्षातही विविध विषयांवर होणाऱ्या चर्चेत सर्व पक्ष सहभाग घेतील आणि लोकहिताचे निर्णय तसेच जनतेच्या आकांक्षांची पूर्तता करण्यासाठी आपण पुढे वाटचाल करू असा मला विश्वास वाटतो. ‘सबका साथ, सबका विकास’ या घोषणेने आम्ही आपण प्रवास सुरू केला. देशाच्या जनतेने ‘सबका साथ, सबका विकास’सोबत सर्वांचा विश्वास जोडला आणि हा विश्वास घेऊनच सर्वसामान्य जनतेच्या आशा-आकांक्षांना, स्वप्नांना पूर्ण करण्याचा संकल्प करून आम्ही पुढे जाणार आहोत.

लोकशाहीमध्ये विरोधी पक्ष असणे, विरोधी पक्ष सक्रीय आणि सामर्थ्यवान असणे ही अनिवार्यता आहे आणि मी आशा करतो की विरोधी पक्षातील सदस्य त्यांना मिळालेल्या जागांची संख्या चिंता सोडून देतील. देशाच्या जनतेने त्यांना जितके खासदार निवडून दिले आहेत, ते दिले असतील मात्र कमी संख्येने असले तरीही त्यांचा प्रत्येक शब्द आमच्यासाठी मौल्यवान आहे, त्यांची भावना आमच्यासाठी महत्त्वाची आहे. जेव्हा आपण सर्व सभागृहात खासदार म्हणून बसतो त्यावेळी पक्ष-विरोधी पक्ष या पलिकडे निष्पक्ष असण्याची भावना महत्त्वाची ठरते.  मला विश्वास आहे संसदेतले सर्व सदस्य पक्षीय भूमिकेच्या पलिकडे जाऊन जनहिताला प्राधान्य देतील आणि येणाऱ्या पाच वर्षात या सभागृहाची प्रतिष्ठा आणखी वाढवतील. आधीच्या तुलनेत या सभागृहात अधिक काम होईल तसेच जनहिताच्या कामांमध्ये अधिक ऊर्जा, गती आणि सामूहिक विचार मंथन करण्याच्या संधी उपलब्ध होतील.

सभागृहात अनेक सदस्य असे असतात जे अतिशय उत्तम विषय आणि विचार मांडतात, कुठल्याही चर्चेत त्यांचा सहभाग महत्त्वाचा असतो. मात्र, त्यांचे भाषण अभ्यासपूर्ण असल्यामुळे अनेकदा टीआरपीशी त्याचा मेळ जमत नाही. मात्र, टीआरपीच्या पलिकडे जात अशा सदस्यांना अधिक वेळ दिला जाईल. तर्कशुद्ध आणि अभ्यासपूर्ण पद्धतीने कोणी संसदेत सरकारवर टीका केली तर ती टीकाही जनतेपर्यंत पोहोचली पाहिजे ज्यातून लोकशाही बळकट होईल. लोकशाही बळकट करण्यासाठी माझ्या तुम्हा सर्वांकडून अनेक अपेक्षा आहेत. सुरुवातीला सर्व सदस्य या अपेक्षा पूर्ण करतील मात्र पुढचे पाच वर्ष तिच भावना प्रबळ ठेवण्यासाठी आपण सकारात्मक भूमिका निभवायला हवी तरच सभागृहाची दिशाही सकारात्मक असेल. 17व्या लोकसभेत नवी ऊर्जा, नवा विश्वास, नवा संकल्प आणि नव्या स्वप्नांसह आपण एकत्र वाटचाल करू यासाठी मी तुम्हा सर्वांना सोबत येण्याचे निमंत्रण देतो आहे. देशाच्या सर्वसामान्य जनतेच्या आशा-आकांक्षा पूर्ण करण्यात आपण कुठेही कसर सोडायला नको, कमी पडायला नको. या विश्वासासह मी तुम्हा सर्वांना धन्यवाद देतो.

Exit mobile version