मुंबई : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मराठी भाषा विभागाच्या राज्य मराठी विकास संस्थेतर्फे उद्या रविवार दि.23 ते 26 फेब्रुवारी दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. प्रभादेवी येथील पु. ल. देशपांडे कला अकादमी कलांगण येथे दररोज सायंकाळी 6 वाजता हे कार्यक्रम होतील.
‘भाषा भरजरी तिचा उत्सव जरतारी’ या विशेष कार्यक्रमांतर्गत लोकसंगीत, काव्यमय गप्पा, मराठीतील आद्य काव्यसंग्रहाची ओळख आदी कार्यक्रम रसिकांसाठी पर्वणी ठरणार आहे. हा कार्यक्रम विनामूल्य असून या विविधरंगी कार्यक्रमाचा आस्वाद रसिकांनी घ्यावा असे आवाहन मराठी भाषा विभाग व राज्य मराठी विकास संस्थेतर्फे करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाची रुपरेषा पुढीलप्रमाणे :
रविवार दि.23 फेब्रुवारी : लोकसंगीतमय कार्यक्रम : लोकसाहित्य आणि प्रयोगात्म लोककला हे माध्यम मराठी भाषा समृध्द आणि सक्षम करण्यासाठी लोककलावंत कुठल्या दृष्टीकोनातून विचार करतो? याचा आढावा घेणारा लोकसंगीतमय कार्यक्रम. या कार्यक्रमाची संकल्पना व दिग्दर्शन डॉ. गणेश चंदनशिवे यांचे असून श्री. चंदनशिवे, डॉ. शिवाजी वाघमारे, शाहीर यशवंत जाधव, शाहीर निशांक जयनू शेख आणि सहकारी सादरीकरण करतील.
सोमवार दि.24 फेब्रुवारी : चित्रपटात मराठी भाषेचे प्रयोग : मराठी चित्रपटांमध्ये मराठी भाषेचे वेगवेगळे प्रयोग पाहायला मिळतात. याकडे लेखक, दिग्दर्शक आणि कलाकार नेमके कोणत्या नजरेने बघतात याचा आढावा घेणारा गप्पांचा कार्यक्रम. यामध्ये सोनाली कुलकर्णी, सचिन खेडेकर, महेश मांजरेकर, प्रियदर्शन जाधव, प्रसाद ओक, मंगेश कुलकर्णी या दिग्गजांचा समावेश असेल.
मंगळवार दि.25 फेब्रुवारी : मराठी काव्य व गीतांचा बदलता भाषिक प्रवाह : मराठी काव्य आणि गीतांचा भाषिक प्रवाह कसा बदलत गेला याचा मागोवा घेणारा गप्पांचा काव्यमय कार्यक्रम. यामध्ये किशोर कदम ऊर्फ सौमित्र, मंदार चोळकर, समीर सामंत, गुरू ठाकूर व मिलिंद कुलकर्णी गप्पांच्या माध्यमातून हा प्रवाह कसा बदलत गेला याचा उलगडा करतील.
बुधवार दि.26 फेब्रुवारी : मराठीतील आद्य काव्यसंग्रहाची ओळख : महाराष्ट्रातील सातवाहन घराण्यातील हाल या राजाने समाजातील सर्व स्तरातील लोकांनी लिहिलेल्या कवितांच्या संपादित केलेल्या ‘गाहा सत्तसई’ या मराठीतील जवळजवळ 2000 वर्षापूर्वीच्या आद्य काव्यसंग्रहाची ओळख करून देणारा कार्यक्रम. माधुरी धोंड यांची निर्मिती असून संकल्पना, लेखन व निवेदन लक्ष्मीकांत धोंड यांचे आहे. सहनिवेदन दीप्ती भागवत, दिग्दर्शन अधीश पायगुडे, संगीत देवेंद्र भोमे, नृत्यसंयोजन मृण्मयी नानल, गायन पं. विश्वनाथ दाशरथे, अंजली मराठे तर नृत्य जान्हवी पवार यांचे असेल. दासू वैद्य, श्रीकांत उमरीकर, लक्ष्मीकांत धोंड गाहांचा भावानुवाद सादर करतील. मराठी भाषा मंत्री श्री. सुभाष देसाई आणि सचिव प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांच्या मार्गदर्शनातून हा कार्यक्रम साकारण्यात आला आहे.