मुंबई : विधानपरिषदेत दिवंगत माजी सदस्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. माजी सदस्य दिवंगत तुकाराम नारायण माताडे तसेच माजी सदस्य दिवंगत पांडुरंग जयरामजी हजारे यांच्या निधनाबद्दल शोक प्रस्ताव मांडण्यात आला होता.
विधानपरिषदेचे माजी सदस्य दिवंगत तुकाराम नारायण माताडे यांनी शैक्षणिक क्षेत्रात भरीव योगदान दिले आहे, अशा शब्दात सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या. दिवंगत तुकाराम माताडे यांच्या निधनाबद्दल शोक प्रस्ताव मांडण्यात आला होता.
सभापती म्हणाले, तुकाराम माताडे यांचा जन्म 2 जानेवारी, 1938 रोजी पुणे जिल्ह्यात जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथे झाला. त्यांचे शिक्षण बी.ए. बीएडपर्यंत झाले होते. त्यांनी सुरुवातीस काही काळ महात्मा फुले हायस्कूल, नाना पेठ, पुणे व भारत इंग्लिश स्कूल, शिवाजीनगर, पुणे येथे अध्यापनाचे कार्य केले होते. तसेच त्यांनी पुणे माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष; महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षक संघाचे सह कार्यवाह; भारतीय शिक्षण मंडळाचे कार्यावाह; पुणे महानगरपालिका शाळा सुधार समितीचे अध्यक्ष; पुणे येथील शिक्षक सहकारी गृहनिर्माण संस्थेचे सदस्य; महाराष्ट्र राज्य शारीरिक शिक्षक संघाचे सल्लागार;महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर महासंघाचे अध्यक्ष; मध्यवर्ती कारागृह समितीचे सदस्य तसेच पुणे महानगरपालिका शिक्षण मंडळाचे अध्यक्ष म्हणूनही उत्तम कार्य केले. पुणे जिल्ह्यातील अनेक शैक्षणिक व सामाजिक संस्थांशी त्यांचा निकटचा संबंध होता. शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी त्यांनी विशेष योगदान दिले.
दिवंगत तुकाराम माताडे सन 1978 मध्ये पुणे विभाग शिक्षक मतदारसंघातून महाराष्ट्र विधानपरिषदेवर निर्वाचित झाले.
मंगळवार, दि. 30 एप्रिल, 2019 रोजी त्यांचे निधन झाले. सभागृह नेते महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी हा शोकप्रस्ताव मांडला. या शोकप्रस्तावावर विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, कामगार राज्यमंत्री संजय (बाळा) भेगडे, डॉ. नीलम गोऱ्हे यांनीही आपल्या शोक भावना व्यक्त केल्या
विधानपरिषदेचे माजी सदस्य दिवंगत पांडुरंग जयरामजी हजारे यांनी रामटेक मतदारसंघाच्या विकासासाठी विशेष योगदान दिले. अशा शब्दात सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या. दिवंगत हजारे यांच्या निधनाबद्दल शोकप्रस्ताव मांडण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.
सभापती श्री. नाईक-निंबाळकर म्हणाले,पांडुरंग हजारे यांचा जन्म 18 जानेवारी,1928 रोजी नागपूर जिल्ह्यात कुही तालुक्यातील अंबाडी येथे झाला. त्यांचे शिक्षण इंटर (आर्टस्) पर्यंत झाले होते.
दिवंगत हजारे यांनी रामटेक नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक;श्री.जगदंबा महिला औद्योगिक सहकारी संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष; नागपूर जिल्हा जनता दलाचे अध्यक्ष; महाराष्ट्र जनता दलाचे उपाध्यक्ष तसेच त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य म्हणूनही उत्तम कार्य केले होते. नागपूर जिल्ह्यातील अनेक शैक्षणिक व सामाजिक संस्थांशी त्यांचा निकटचा संबंध होता.
दिवंगत हजार हे सन 1985 व 1990 असे दोन वेळा नागपूर जिल्ह्यातील रामटेक मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेवर तर सन 1996 मध्ये महाराष्ट्र विधानसभा सदस्यांद्वारा महाराष्ट्र विधानपरिषदेवर निर्वाचित झाले होते.
शनिवार, दि. 1 जून, 2019 रोजी त्यांचे निधन झाले. सभागृहनेते महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी हा शोकप्रस्ताव मांडला. या शोकप्रस्तावावर विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, कामगार राज्यमंत्री संजय (बाळा) भेगडे, डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आपल्या शोक भावना व्यक्त केल्या