मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्र विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सोमवारपासून सुरुवात होते आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी वार्ताहर परिषदेला संबोधित केले. महात्मा फुले शेतक-यांची कर्जमुक्ती योजनेच्या लाभार्थ्यांची पहिली यादी सोमवारी जाहीर होणार असल्याची घोषणा त्यांनी यावेळी केली.
यामध्ये प्रत्येक जिल्ह्यातल्या दोन गावांचा समावेश करण्यात आला असून सुमारे २० हजार शेतकऱ्यांचा समावेश पहिल्या यादीत असेल असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. या कर्जमुक्ती योजनेसाठी एकूण ३५ लाख शेतकऱ्यांची माहिती सरकारकडे आली असून त्यांच्या आवश्यक कागदपत्रांची पडताळणी सुरू असल्याचे पवार यांनी स्पष्ट केले. कर्जमुक्तीची पूर्ण प्रक्रिया मे महिन्यापूर्वी पूर्ण करण्यात येणार आहे. कर्जमुक्तीचे पैसे थेट लाभार्थ्यांच्या कर्जाच्या खात्यात जमा करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले.
एल्गार परिषद प्रकरणाचा तपास केंद्र सरकारने राष्ट्रीय तपास संस्थेकडे सोपविल्याच्या निर्णयावर मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली. मात्र केंद्र सरकारने त्यांच्या अधिकारात हा निर्णय घेतल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. गिरणी कामगारांच्या घरांची येत्या १ मार्चला सोडत काढणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.
सरपंचांची थेट निवड करण्याचा आधीच्या सरकारचा निर्णय रद्द करण्यासंदर्भात राज्यपालांशी कोणतेही मतभेद नसल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. अधिवेशन लवकरच सुरू होणार असल्याने अध्यादेश काढण्याऐवजी हा विधेयक मांडून अधिवेशनात याची मंजुरी घ्यावी असे राज्यपालांनी सुचविल्याचे पवार म्हणाले.