मुंबई : इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्मारकाचे काम युद्धपातळीवर करण्याच्या सूचना विधानसभा अध्यक्ष श्री. नाना पटोले यांनी दिल्या. कामाची प्रगती पाहण्यासाठी मंगळवारी स्वतः सर्व संबंधित अधिकारी व पदाधिकाऱ्यांसह स्मारकाच्या जागेस भेट देणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकासंदर्भात विधानसभा अध्यक्ष श्री. पटोले यांच्या अध्यक्षतेखाली विधान भवनात बैठक झाली. यावेळी सामाजिक न्याय विभागाचे राज्यमंत्री संजय बनसोडे, खासदार राहुल शेवाळे उपस्थित होते.
श्री. पटोले म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक हे जागतिक दर्जाचे व्हावे. लवकरात लवकर हे स्मारक पूर्ण व्हावे, अशी अनुयायांची भावना आहे. त्यामुळे ‘एमएमआरडीए’ने स्मारकाचे काम युद्धपातळीवर करावे. स्मारकाच्या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर न्याय विद्यापीठ व्हावे, अशी मागणी आहे. याबाबतची शक्यता पडताळून पहावी.
श्री. बनसोडे यांनीही स्मारकाचे काम लवकरात लवकर व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. तसेच श्री. शेवाळे यांनी स्मारक व चैत्यभूमी यांना जोडणारा रस्ताही करण्यात यावा, अशी सूचना करून चैत्यभूमीचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची मागणी केली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीच्या वतीने सरचिटणीस श्री. नागसेन कांबळे व अध्यक्ष श्री. महेंद्र कांबळे यांनी स्मारकासंबंधीच्या विविध मागण्यांचे निवेदन दिले. स्मारकाच्या कामाचा वेग वाढवावा, स्मारकाचे मुख्य प्रवेशद्वार हे सांची स्तुपाच्या रुपात असावे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यावर स्टॅच्यू ऑफ इक्विटी असे लिहावे. सुसज्ज ग्रंथालय असावे, स्मारकाच्या ठिकाणी सामाजिक न्याय विद्यापीठ स्थापन करावे, डॉ. आंबेडकर यांचे संघर्ष दाखविणारे चित्रण, विविध आंदोलनाचे चित्रण तसेच त्यांचे आई-वडील, पत्नीचे शिल्प रेखाटावे, डॉ. आंबेडकरांच्या भाषणाचे प्रदर्शन दालन उभारावे आदी मागण्या यामध्ये मांडण्यात आल्या. यावेळी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या अतिरिक्त आयुक्त श्रीमती सोनिया सेठी, वास्तुरचनाकार शशी प्रभू आदी यावेळी उपस्थित होते.