Site icon साप्ताहिक एकच ध्येय

आदिवासींचे जीवन बदलविणाऱ्या योजना कालबद्ध रितीने राबविण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निर्देश

मुंबई : आदिवासींच्या विकासासाठीच्या योजनांची कालबद्ध रितीने व समन्वयाने अंमलबजावणी झाल्यास त्यांना खऱ्या अर्थाने फायदा होईल व ते मुख्य प्रवाहात येऊ शकतील असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

विधानभवन येथे श्रमजीवी संघटनेच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी झालेल्या चर्चेवेळी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते.

श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित यांनी वनाधिकार, गावठाण विस्तार, जातीचे दाखले, कातकरी उत्थान, अन्न सुरक्षा योजना, आरोग्याची स्थिती आदी बाबींकडे  मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले आणि निवेदन दिले.

मुख्यमंत्री श्री.ठाकरे म्हणाले, आदिवासींच्या विकासासाठीच्या विविध योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी नियोजन करावे. सर्व संबंधित विभागांच्या सचिवांची मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली यासंदर्भात बैठक घ्यावी. आदिवासींना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांच्यासाठीच्या योजना अधिक व्यवहार्यपणे कशा राबविल्या जातील ते पाहिले पाहिजे व या योजनांद्वारे त्यांचे जीवन बदलविणे गरजेचे आहे, असेही श्री.ठाकरे यांनी सांगितले.

यावेळी महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ.नितीन करीर, वन विभागाचे अपर मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, आदिवासी विकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा वर्मा  हे उपस्थित होते.

Exit mobile version