नवी दिल्ली : महाराष्ट्रातील 48 पैकी 34 खासदारांची मराठी भाषेतून शपथ घेतली. भाजपाचे रावसाहेब दानवे, शिवसेनेचे अरविंद सावंत या केंद्रीय मंत्र्यांनी खासदारकीची शपथ मराठीतून घेतली.
त्यापाठोपाठ औरंगाबाद येथील एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील, धैर्यशील माने, नवनीत राणा, प्रितम मुंडे यांनी लोकसभेत मराठीतून शपथ घेतली. औरंगाबादचे नवनिर्वाचित खासदार इम्तियाज जलील यांनी कोणत्या भाषेत खासदारकीची शपथ घेणार, याची उत्सुकता सर्वांनाच होती मात्र त्यांनी मराठीतून शपथ घेतल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या.
तर सुप्रिया सुळे यांनी हिंदीतून आणि, सातारचे खासदार उदयनराजे भोसले, डॉ. सुजय विखे यांनी इंग्रजीतून सदस्यत्वाची शपथ घेतली. तर राष्ट्रवादीचे शिरुर लोकसभेचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी मराठी भाषेतून शपथ घेतली त्याचसोबत जय शिवराय, जय महाराष्ट्र असं उच्चारताच संसदेत जय भवानी, जय शिवाजी अशी घोषणाबाजी झाली.
भाजपाचे मनोज कोटक, शिवसेनेचे विनायक राऊत, ओमप्रकाश निंबाळकर,सदाशिव लोखंडे, श्रीरंग बारणे, श्रीकांत शिंदे, राजन विचारे, गजानन किर्तीकर यांच्यासह अन्य खासदारांनी मराठीतून शपथ घेतली. पूनम महाजन, हिना गावित, नितीन गडकरी, सुधाकर शृंगारे, गोपाळ शेट्टी ह्यांनी हिंदीतून शपथ घेतली तर सुजय विखे, उदयनराजे भोसले ह्यांनी इंग्रजीमधून तर गिरीष बापट, उन्मेश पाटील, सुनील मेंढे ह्यांनी संस्कृत मधून शपथ घेतली.अनेक दिवसांपासून संसदेत महाराष्ट्रातील खासदारांनी मराठीत शपथ घ्यावी यासाठी सोशल मिडीयावर मोहीम सुरु होती.