मध्यवर्ती सभागृहात ‘इये मराठीचिये नगरी’ कार्यक्रम – सभापती रामराजे नाईक-निंबाळकर
मुंबई : मराठी भाषा दिनानिमित विधिमंडळात 27 फेब्रुवारी रोजी (गुरुवारी) विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती सभापती रामराजे नाईक- निंबाळकर यांनी विधानपरिषदेत दिली.
सभापतींनी आपल्या निवेदनात सांगितले, मराठी भाषेची गौरवशाली परंपरा जपण्यासाठी व तिचे संवर्धन करण्यासाठी महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय यांच्या विद्यमाने विधिमंडळात मराठी भाषा गौरव दिनानिमित्त गुरुवार दिनांक 27 फेब्रुवारी 2020 रोजी सकाळी 10.30 ते दुपारी 1.45 वाजेपर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
प्रारंभी विधान भवन प्रांगणातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनाधिष्ठित पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात येईल. त्यानंतर ग्रंथ दिंडी, बारा बलुतेदारांचे चित्रमय दर्शन व मध्यवर्ती सभागृहात ‘इये मराठीचिये नगरी’ हा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या सर्व कार्यक्रमांना विधान परिषद सभापती, विधानसभा अध्यक्ष, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मराठी भाषा मंत्री, महसूलमंत्री, संसदीय कार्यमंत्री, विधान परिषद उपसभापती, दोन्ही सभागृहाचे विरोधी पक्षनेते तसेच राज्याचे मंत्री व राज्यमंत्री , दोन्ही सभागृहाचे सदस्य, आणि लोकसभा व राज्यसभा सदस्य उपस्थित राहणार आहेत.