Site icon साप्ताहिक एकच ध्येय

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर केवळ एक जण निरीक्षणाखाली – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

मुंबई : राज्यात कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सध्या केवळ एक जण पुणे येथे निरीक्षणाखाली दाखल आहे. आतापर्यंत ८६ जणांना घरी सोडण्यात आले असून मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर चीनसह अन्य नऊ देशांतील प्रवाशांची तपासणी होत असल्याने त्यासाठी वाढीव मनुष्यबळ सार्वजनिक आरोग्य विभाग आणि महानगरपालिकेकडून मुंबई विमानतळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आजपर्यंत ४२५ विमानांमधील  ५२ हजार २२९ प्रवासी तपासण्यात आले आहेत. केंद्र सरकारच्या नवीन सूचनेनुसार चीन, हाँगकाँग, थायलंड, सिंगापूर, दक्षिण कोरिया,जपान या देशासोबत नेपाळ, इंडोनेशिया, व्हिएतनाम आणि मलेशिया या देशातील प्रवाशांची तपासणीही विमानतळावर केली जात आहे.

बाधित भागातून आलेल्या प्रवाशांचा शोध क्षेत्रीय सर्वेक्षणातूनही घेण्यात येत आहे. आजपर्यंत राज्यात बाधित भागातून २९७ प्रवासी आले आहेत. त्यापैकी २२१ प्रवाशांचा १४ दिवसांचा पाठपुरावा पूर्ण झाला आहे.

१८ जानेवारीपासून ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळल्याने राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात आजपर्यंत ८७ जणांना भरती करण्यात आले. त्यापैकी ८६ जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोनाकरिता निगेटिव्ह असल्याचा निर्वाळा एनआयव्ही पुणे यांनी दिला आहे. आजवर भरती झालेल्या ८७ प्रवाशांपैकी ८६ जणांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. सध्या  एकजण पुणे येथे भरती आहे.

Exit mobile version