इस्त्रायलच्या राजदूतांसह शिष्टमंडळाने घेतली मुख्यमंत्र्यांची भेट
मुंबई : महाराष्ट्रातील कृषी, जलव्यवस्थापन, सिंचन अशा विविध क्षेत्रातील उच्च तंत्रज्ञान प्रकल्पांसाठी इस्त्रायलशी सहकार्य वृध्दिंगत करता येणे शक्य असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. इस्त्रायलचे भारतातील राजदूत डॉ.रॉन मल्का यांनी शिष्टमंडळासह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सह्याद्री राज्य अतिथी गृह येथे भेट घेतली. यावेळी राजशिष्टाचार, पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे उपस्थित होते.
इस्त्रायलचे भारताशी घनिष्ठ आणि सौहार्दाचे संबंध आहेत. विविध क्षेत्रात अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या बाबतीत इस्त्रायल सहकार्य प्रकल्प राबवित असल्याचे डॉ. रॉन यांनी सांगितले. महाराष्ट्रात कृषी तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात “सेंटर ऑफ एक्सलन्स” च्या माध्यमातून नागपूर आणि दापोलीत काम सुरू आहे. यासह अन्य क्षेत्रातील प्रकल्पांसाठी सहकार्य करण्याची इस्त्रायलची भूमिका असल्याचे डॉ. मल्का यांनी सांगितले. विशेषतः महाराष्ट्रात कृषी, जल व्यवस्थापन, ऊर्जा अशा महत्त्वाच्या क्षेत्रात संधी आहे. त्यादृष्टीने कृषी क्षेत्रात “सेंटर ऑफ एक्सलन्स”ची महाराष्ट्रातील व्याप्ती वाढविण्याबाबत चर्चा झाली. डाळिंब आणि फळपीक क्षेत्रात अशा केंद्राचा विस्तार करता येणार आहे. भूजलातील अपायकारक घटक काढून ते पिण्यायोग्य करणे, नागरी क्षेत्रातील सांडपाणी प्रक्रिया, उद्योगासाठीचे पाणी पुनर्वापर तंत्रज्ञान यांसह कृषी सिंचनातील सूक्ष्म तंत्रज्ञान याबाबत चर्चा झाली.
बैठकीस गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव संजय कुमार,मुंबई महापालिकेचे आयुक्त प्रविण परदेशी, राजशिष्टाचार विभागाच्या प्रधान सचिव मनिषा म्हैसकर, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव आशिष कुमार सिंह, विकास खारगे, नगरविकास विभागाचे सचिव महेश पाठक, कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले आदी उपस्थित होते.