भोसरी : मोशीतील नव्याने होणाऱ्या एक हजार टन क्षमतेच्या रिकव्हरी फॅसेलिटी (एमआरफ)च्या प्रकल्पाची व प्लास्टिकपासून इंधन निर्मितीची महापौर राहूल जाधव, आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी पाहणी केली. स्थापत्य पर्यावरण विभागाचे कार्यकारी अभियंता संजय कुलकर्णी, एस.एस.एन.इन्फ्रा कंपनीचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. हे प्रकल्प निवडणुकीपूर्वी पुर्ण करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
महापौरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. तसेच प्लास्टिकपासून ग्रॅन्युअल (प्लास्टिकचे दाने)फ्लेवर ब्लॉक बनविणे. बांधकामाच्या राडारोड्यावर प्रक्रिया करणाऱ्या प्लॉटची पाहणी केली.
पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातून सध्यस्थितीला मोशी कचरा डेपोवर प्रतिदिन सुमारे 850 मेट्रिक टन कचरा येत आहे. ठेकेदार व महापालिकेच्या यंत्रणेद्वारे कचरा संकलन करून डेपोपर्यंत नेला जातो. यात घरोघरच्या कचऱ्यासह हॉटेल, कंपन्या, त्यातील कँटीन, गटारे आदी ठिकाणी निर्माण होणाऱ्या कचऱ्याचा समावेश आहे.
कचऱ्याचे वाढते प्रमाण व पूर्ण क्षमतेने भरत आलेला डेपो यातून मार्ग काढण्यासाठी कचऱ्याचे वर्गीकरण करून त्यावर वेगवेगळ्या पद्धतीने प्रक्रिया केली जात आहे. यात प्लॅस्टिकपासून इंधन, पेव्हिंग ब्लॉक, सेंद्रिय खत, गांडूळ खतनिर्मितीचे असे प्रकल्प कार्यान्वयीत आहेत.