नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ओदिशात भुवनेश्वर इथं सुरु असलेल्या खेलो इंडिया आंतरविद्यापीठ क्रीडा स्पर्धांमधे पुण्याच्या सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या साक्षी म्हस्केनं महिला भारोत्तोलन स्पर्धेत 45 किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकलं आहे. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या प्रेरणा सोनावणेनं याच गटात कांस्य पदक जिंकलं.
महिलांच्या 49 किलो वजनी गटात सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या चेतना घोजगेनं रौप्य पदक पटकावलं. पुरुषांच्या भारोत्तोलनात, शिवाजी विद्यापीठाच्या संकेत सरगरनं 55 किलो वजनी गटात 244 किलो वजन उचलून राष्ट्रीय विक्रम नोंदवत सुवर्णपदक जिंकलं.
क्लीन अँड जर्कमध्ये 138 किलो वजन उचलूनही त्यानं राष्ट्रीय विक्रम नोंदवला. याच गटात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या प्रशांत कोळीनं रौप्यपदक पटकावलं. त्यानं स्नॅच मध्ये 110 किलो वजन उचलून राष्ट्रीय विक्रमही नोंदवला. पतियाळाच्या पंजाबी विद्यापीठानं तिरंदाजीत सर्वाधिक पदकं कमावून तिरंदाजीचा चॅंपियन्स करंडक जिंकला.