नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : हिंसाचारग्रस्त ईशान्य दिल्लीतल्या परिस्थितीचा काल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आढावा घेतला. या भागात शांतता निर्माण करण्यासाठी आणि परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी पोलिस आणि इतर संस्था प्रयत्न करत आहेत, असं ट्वीट प्रधानमंत्र्यांनी केलं.
शांतता आणि एकात्मता हा देशाचा आत्मा असून सर्वांनी सदैव बंधुभावाचं आणि शांततेचं वातावरण कायम ठेवावं, असं आवाहन त्यांनी केलं. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी हिंसाचार झालेल्या मौजपूरला भेट दिली आणि तिथल्या स्थानिकांशी चर्चा करून परिस्थितीचा आढावा घेतला. या भेटीनंतर त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना तिथल्या स्थितीची आणि ती पूर्वपदावर आणण्यासाठी केलेल्या उपायांची माहिती दिली.
हिंसाचार झालेल्या भागात सुरक्षा दलं पुरेशा प्रमाणात तैनात असल्याची आणि काल कोणतीही अनुचित घटना घडली नसल्याची माहिती दिल्ली पोलिसांचे प्रवक्ते एम एस रंधावा यांनी वार्ताहरांना दिली. आतापर्यंत १८ प्रथम माहिती अहवाल नोंदवले आहेत आणि हिंसाचार प्रकरणी 106 जणांना अटक केल्याचं त्यांनी सांगितलं.
दिल्ली पोलिसांनी २२८२९३३४आणि २२८२९३३५ हे हेल्पलाईन क्रमांक जारी केले आहेत. मदतीसाठी किंवा काही माहिती देण्यासाठी जनतेनं या क्रमांकांवर संपर्क साधावा असं त्यांनी सांगितलं. या हिंसाचारातल्या बळींची संख्या.18 वर पोहोचली आहे सुरक्षा दलांनी काल बाबरपूर, जोहरीपूर आणि मौजपूर भागात ध्वजसंचलन केलं.