नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताच्या दौऱ्यावर आलेले म्यानमारचे राष्ट्रपती यू विन मिंट यांच्याशी आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी द्वीपक्षीय चर्चा केली.
या चर्चेनंतर अनेक करारांवर सह्या होण्याची अपेक्षा आहे. त्यापूर्वी मिंट यांचं राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात समारंभपूर्वक स्वागत करण्यात आलं. मिंट यांनी महात्मा गांधी यांच्या राजघाट या समाधीस्थळाला भेट दिली आणि गांधीजींना आदरांजली वाहिली.
परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांच्याशी देखील त्यांनी चर्चा केली. मिंट यांच्यासोबत म्यानमारच्या फर्स्ट लेडी दाव चो चो देखील भारताच्या भेटीवर आल्या आहेत. म्यानमारच्या राष्ट्रपतींची आज संध्याकाळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याशी चर्चा होणार आहे.
भारत आणि म्यानमार यांच्यात सांस्कृतिक, भाषिक आणि वांशिक संबंध आहेत. म्यानमार भारताचा पाचव्या क्रमांकाचा व्यापारी भागीदार असून 2018-19 या वर्षात दोन्ही देशांदरम्यानच्या व्यापारात आठ टक्के वाढ झाली.