Site icon साप्ताहिक एकच ध्येय

महाराष्ट्राच्या विकासाला गती देण्यासाठी प्राधान्यक्रमानुसार कामे – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुख्यमंत्री कार्यालयाचा तालुका पातळीपर्यंत विस्तार विचाराधीन

मुंबई : महाराष्ट्राच्या विकासाला गती देण्यासाठी प्राधान्यक्रम ठरवून कामे केली जात आहेत.  राज्याची प्रगती करताना सत्ताधारी आणि विरोधक एकत्र येऊन राज्यासाठी विकासकामे करायला बांधील आहेत, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विधानसभेत सांगितले.

राज्यपालांच्या अभिभाषणावर झालेल्या चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री बोलत होते.  ते म्हणाले, विकासकामांच्या बाबतीत गती पकडली आहे. आम्ही विकासाचे मारेकरी नसून महाराष्ट्र प्रेमी आहोत.  विकासकामांचे प्राधान्यक्रम ठरवून त्याची अंमलबजावणी केली जात आहे.

राज्यातील गोरगरीब जनतेला मंत्रालयात लहान-सहान गोष्टीसाठी हेलपाटे मारावे लागू नये, यासाठी मुख्यमंत्री कार्यालय विभागीय स्तरावर सुरु केले. आता त्याचा विस्तार तालुका पातळीपर्यंत करण्यासंदर्भात विचाराधीन असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

यावर्षी महाराष्ट्राला 60 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त देशालाच नव्हे तर जगाला हेवा वाटावा असा हीरकमहोत्सव साजरा करूया, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.  महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेची तीन दिवसांपूर्वी पहिली यादी जाहीर झाली.  पुढील एक-दोन दिवसात दुसरी यादी जाहीर करू.  मी आणि उपमुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. शेतकऱ्यांना योजनेविषयी समाधान वाटले. या योजनेमुळे रुग्णालयात दाखल असलेल्या 85 वर्षीय वृद्धेला कर्जमुक्तीचा लाभ मिळाला हे ऐकून आनंद वाटल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

शिवभोजन योजनेमुळे गरजूंसाठी सोय झाली आहे. सरकार यशाच्या दिशेने ठामपणे पाऊले टाकत आहे.  आदिवासी बांधवांच्या आणि दुर्बल घटकांच्या रक्षणासाठी शासन त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे असल्याचे वचन मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

मराठी रंगभूमीची देशाला मोठी देणगी असून या रंगभूमीने समाजातील व्यथांवर भाष्य केले.  या रंगभूमीचा इतिहास सांगणारे दालन मुंबईत उभे करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

कर्नाटकव्याप्त महाराष्ट्रामध्ये मराठी बांधवांवर भाषेचा अत्याचार आम्ही सहन करणार नाही.  राजकीय विचार बाजूला ठेवून तिथल्या मराठी मातेच्या पुत्रांसाठी एकजुटीने प्रयत्न करू या असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले. महाराष्ट्रात महिला अत्याचाराबाबत कायदा जलद गतीने तयार केला जात आहे. विरोधकांनी उणीवा जरूर दाखवाव्यात मात्र राज्याच्या विकासासाठी सत्ताधारी आणि विरोधक दोन्ही बांधील आहेत हे लक्षात ठेवावे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

Exit mobile version