Site icon साप्ताहिक एकच ध्येय

महिला सक्षमीकरणासाठी काम करीत असलेल्या संस्थांना अधिकाऱ्यांनी सहकार्य करावे – जिल्हाधिकारी नवल किशोर राम

पुणे : आरोग्य, शिक्षण, सार्वजनिक सुरक्षितता आणि जीवनमान उंचावणे या माध्यमातून मुली आणि महिलांच्या सक्षमीकरणासाठी काम करत असलेल्या संस्थांना संबंधित अधिकाऱ्यांनी सहकार्य करावे,अशा सूचना जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयात महिलासंक्षमीकरणासाठी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस पोलीस अधीक्षक (ग्रामीण) संदिप पाटील, उपजिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख, युनायटेड नेशेन्स फाऊंडेशनच्या डॉ.गीताराव गुप्ता, शैलजा आरळकर आदीची उपस्थिती होती.

जिल्हाधिकारी राम पुढे म्हणाले, आरोग्य, शिक्षण, सार्वजनिक सुरक्षितता आणि जीवनमान उंचावणे या माध्यमातून मुली आणि महिलांच्या सक्षमीकरणासाठी या संस्थांनी प्रायोगिक तत्वावर पुणे जिल्हयातील खेड तालुक्यातील शेलगांव मंदोसी, खरोदी, ढेणे व पुरंदर तालुक्यातील नायगाव, भिवरी अशी एकूण पाच गावे दत्तक घेतली असून या गावांमध्ये मुली व महिलांच्या अडी-अडचणी सोडविण्याबरोबरच महिलांविषयक शासकीय योजनांची जनजागृती करण्याचेही काम ही संस्था करणार आहे. हे काम करीत असतांना संस्थेच्या सदस्यांना जिल्हा, तालुका आणि गावपातळीवरील सर्व संबंधित अधिकारी यांनी आवश्यक ते सहकार्य करुन त्यांना कुठली अडचण येणार नाही याची दक्षता घ्यावी, अशा सूचनाही श्री. राम यांनी दिल्या.

पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदिप पाटील म्हणाले, पोलीस विभागाकडूनही जिल्हा पातळीवरील अधिकारी, कर्मचारी यांना महिला सुरक्षिततेविषयी काम करण्याबाबतचे प्रशिक्षण दिले जात आहे. तसेच ग्रामीण भागात ग्राम सुरक्षादल आणि महिला सुरक्षा समितीही एकमेकांशी समन्वय ठेवून काम करत आहेत. या बैठकीस सदस्य, संबंधित विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

Exit mobile version