मुंबई : राज्य शासनाने २०१९-२० या आर्थिक वर्षासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकरिता १२ हजार ३०३ कोटी ९४ लाख रुपयांची विक्रमी तरतूद केल्याबद्दल सामाजिक न्याय राज्यमंत्री अविनाश महातेकर यांनी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे आभार व्यक्त केले.
सन २०१९-२० वर्षाचा अतिरिक्त अर्थसंकल्प सादर केल्यानंतर राज्यमंत्री महातेकर पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले की, सामाजिक न्याय विभागासाठी मोठी तरतूद करुन राज्य शासनाने दलितांच्या विकासाला प्राधान्य असल्याचे दाखवून दिलेले आहे.
वृद्ध, निराधार, दिव्यांग व विधवा या दुर्बल घटकांचे जीवन सुसह्य करण्याठी संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ योजनेचे दरमहा ६०० रुपये अनुदान आता १००० करण्यात आले आहे. विधवा लाभार्थ्यांना १ अपत्य असल्यास ११०० रुपये तर दोन अपत्य असल्यास प्रतीमाह १२०० रुपये अर्थसहाय्य यापुढे दिले जाणार आहे.
सामाजिक न्याय, विजाभज, महिला व बालविकास, आदिवासी विकास विभागांतर्गत येणाऱ्या अनुदानित संस्थांमधील विद्यार्थ्यांच्या परिपोषण आहाराचे अनुदान ९०० रुपयांचे १५०० रुपये करण्यात आले आहे. तर एचआयव्ही बाधीत विद्यार्थ्यांचे अनुदान ९९० वरुन १६५० रुपये करण्यात आल्याचे राज्यमंत्री श्री. महातेकर यांनी सांगितले. विद्यार्थ्यांच्या अनुदानात वाढ करुन शिक्षणातून उद्याची पिढी सक्षम घडावी याच भूमिकेतून हे निर्णय घेतले असल्याचे श्री. महातेकर म्हणाले.
आपल्या साहित्यातून सामान्य माणसांच्या दु:खाला वाचा फोडणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षाप्रित्यर्थ विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी १०० कोटीचा निधी राखून ठेवल्याबद्दल श्री. महातेकर यांनी अर्थमंत्र्यांना धन्यवाद दिले.