Site icon साप्ताहिक एकच ध्येय

प्लास्टिक बंदी ही लोकचळवळ होणे गरजेचे – पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे

मुंबई : प्लास्टिक बंदीच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी लोकांनी सवय आणि सोय बदलणे गरजेचे आहे. प्लास्टिक बंदी ही लोकचळवळ होणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी आज विधानपरिषदेत केले. राज्यात प्लास्टिक पिशव्यांच्या वापरावर बंदी घालण्याबाबतचा प्रश्न सदस्य रामहरी रुपनवर यांनी उपस्थित केला होता त्याला उत्तर देताना श्री. ठाकरे बोलत होते.

श्री.ठाकरे म्हणाले, येत्या 1 मे महाराष्ट्र दिन हा आपण 60 वा वर्धापनदिन साजरा करीत आहोत. या दिवसापर्यंत राज्यातील सर्व महानगरपालिका, नगरपालिका, ग्रामीण भाग सिंगलयूज प्लास्टिक मुक्त बनविण्याचा प्रयत्न आहे. शासनाने प्लास्टिक बंदी केली असली तरी यात लोकांचा सहभाग महत्त्वाचा आहे. प्लास्टिकचे घातक परिणाम लक्षात घेता सिंगल यूज प्लास्टिक मुक्त चळवळीमध्ये लोकांनी जास्तीत जास्त सहभाग घेतला पाहिजे.

महाराष्ट्र प्लास्टिक व थर्माकॉल अविघटनशील वस्तुंचे (उत्पादन, वापर, विक्री, वाहतूक, हाताळणी, साठवणूक) अधिसूचना 2018 नुसार महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने मुंबई परिक्षेत्रातील 53 प्लास्टिक उत्पादकांना उत्पादन बंद करण्याचे आदेश पारीत करण्यात आले आहेत. त्याचबरोबर बृहन्मुंबई महानगरपालिका व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्यामार्फत संयुक्तपणे बाजारपेठा, हॉटेल्स, मॉल्स इ. ठिकाणी पाहणी करुन प्रतिबंधित प्लास्टिक वापरणाऱ्यांवर कारवाई केली जाते. दि. 23 जून 2018 ते दि. 01 फेब्रुवारी 2020 पर्यंत भेटी दिल्या असून 84 हजार 210 किलो प्लास्टिक जप्त केले आहे व 4 कोटी 54 लाख इतका दंड वसुल करण्यात आला आहे. राज्यातील विभागीय आयुक्त, महापालिका आयुक्त, जिल्हाधिकारी यांना व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे अधिसूचनेची प्रभावीपणे अंमलबजावणीसाठी सूचना देण्यात आल्या असल्याचेही श्री. ठाकरे यांनी सांगितले.

या चर्चेत सदस्य सर्वश्री प्रवीण पोटे, भाई जगताप, विद्या चव्हाण, मनिषा कायंदे आदींनी सहभाग घेतला.

Exit mobile version