ते काल दिल्लीत आढावा बैठकीनंतर बोलत होते. काही लोक दिल्लीत अशांतता माजवण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांचा हा प्रयत्न हाणून पाडा असंही ते म्हणाले. दिल्लीचे पोलीस सर्व जातीधर्मातल्या लोकांना सुरक्षा प्रदान करण्यास सक्षम आहे.
या बैठकीत दिल्ली पोलीस आयुक्त अमूल्य पटनाईक गृहसचिव अजयकुमार भल्ला आदी उपस्थित होते. गेल्या ३६ तासात ईशान्य दिल्लीत कोणतीही मोठी हिंसक घटना घडली नसल्याचं गृहमंत्रालयातर्फे सांगण्यात आलं.
पुढील १० तासांसाठी दिल्लीतली जमावबंदी शिथिल करण्यात आली आहे. आत्तापर्यंत जाळपोळ आदी घटनांविरोधात ४८ प्रथम माहिती अहवाल दाखल करण्यात आले आहेत. या हिंसक घटनांमधे आतापर्यंत ३५ जणांना आपला प्राण गमवावा लागला आहे. आपले कर्तव्य बजावत असताना दोन सुरक्षाकर्मींना देखील आपला प्राण गमवावा लागला आहे. केंद्रीय निमलष्करी दलाच्या सात हजार तुकड्या या भागात तैनात करण्यात आल्या आहेत अशी माहिती गृहमंत्रालयानं दिली आहे.
मदतीसाठी २२ ८२ ९३ ३४ आणि ३५ या हेल्पलाईन क्रमाकांवर संपर्क साधता येईल. ईशान्य दिल्लीतल्या हिंसाचाराचे साक्षीदार असलेल्या किंवा त्याबाबत माहिती असलेल्या लोकांनी पुढं येऊन ही माहिती द्यावी असं आवाहन दिल्ली पोलीसांनी केलं आहे.