Site icon साप्ताहिक एकच ध्येय

सरपंचांच्या मानधनवाढीसाठी अर्थसंकल्पात २०० कोटी रुपयांची तरतूद-ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्याकडून निर्णयाचे स्वागत

मुंबई : सरपंचांच्या मानधनामध्ये लक्षणीय वाढ करण्याचे प्रस्तावित करुन त्यासाठी २०० कोटी रुपयांचा भरीव आर्थिक निधी उपलब्ध करुन देण्यात येत असल्याची घोषणा अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवर यांनी आज विधानसभेत अतिरिक्त अर्थसंकल्प सादर करताना केली. ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी या घोषणेचे स्वागत केले असून या निर्णयामुळे ग्रामविकासासाठी झटणाऱ्या सरपंचांना मोठे प्रोत्साहन मिळेल, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे.

मंत्री पंकजा मुंडे यांनी सरपंचांच्या मानधनवाढीसाठी शासनस्तरावर सातत्याने पाठपुरावा केला होता. आजच्या घोषणेने त्यांच्या पाठपुराव्यास यश आले असून सरपंचांना आता लक्षणीय मानधनवाढ मिळणार आहे. मंत्री पंकजा मुंडे यांच्याकडे सरपंच संघटनांनी याबाबत मागणी केली होती.

अतिरिक्त अर्थसंकल्पाबाबत प्रतिक्रिया देताना मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या,समाजातील दिन-दलित, वंचित, बहुजन,शेतकरी, युवक, महिला, दिव्यांग अशा सर्व समाजघटकांना न्याय देणारा हा सर्वसमावेशक अतिरिक्त अर्थसंकल्प आहे. अतिरिक्त अर्थसंकल्पात ग्रामविकासासाठीही भरीव आर्थिक तरतूद करण्यात आली असून यामुळे ग्रामविकासाच्या चळवळीला अजून जास्त गती मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

अतिरिक्त अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आलेले मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, १२ बलुतेदारांच्या सक्षमीकरणासाठीचा कार्यक्रम, नापास विद्यार्थ्यांसाठी कौशल्य विकास योजना,धनगर समाज बांधवांच्या विकासासाठी विविध प्रकारच्या २२ योजना,दिव्यांगांसाठी घरकुल योजना, ओबीसी महामंडळाकरीता आर्थिक तरतूद,ओबीसी विद्यार्थ्यांकरीता विविध योजना,महिला बचतगटांसाठी प्रज्वला योजना,ग्रामीण महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाकरीता नवतेजस्विनी योजना, कोतवालांच्या मानधनात वाढ अशा विविध योजनांमधून समाजातील विविध घटकांच्या विकासाला मोठ्या प्रमाणात चालना मिळेल. संजय गांधी निराधार योजना तसेच श्रावणबाळ सेवा निवृत्तीवेतन योजना यांच्या अनुदानात करण्यात आलेली वाढही क्रांतिकारी असून यामुळे निराधार, वृद्ध, विधवा अशा वंचित घटकांना मोठा दिलासा मिळेल, असा विश्वास मंत्री पंकजा मुंडे यांनी व्यक्त केला.

Exit mobile version