Site icon साप्ताहिक एकच ध्येय

सौदी अरेबियाकडून नागरिकांना मक्का आणि मदिना इथं जाण्यास बंदी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नोवेल कोरोना विषाणू संसर्गाचा वाढता प्रसार लक्षात घेऊन सौदी अरेबियानं गल्फ सहयोगी परिषदेतल्या सहा राष्ट्रांच्या नागरिकांवर मक्का आणि मदिना इथं प्रवेशासंबंधी निर्बंध घातले आहेत.

संयुक्त अरब अमिरात, सौदी अरब, बहरीन, कुवैत, ओमान आणि कतार या देशांमधल्या नागरिकांनी मक्का आणि मदिना या ठिकाणी जाऊ नये अशी सूचना सौदी अरेबियाच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं जारी केली आहे. मात्र जे नागरिक गेले चौदा दिवस सौदी अरेबिया मधेच राहत आहेत, त्यांना हे निर्बंध लागू असणार नाहीत, असं मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे.

इराण मध्ये कोरोना संसर्ग झालेल्या आणखी एका रुग्णाची नोंद झाल्यानं आता तिथल्या कोरोना बाधित रुग्णाची संख्या आठ वर पोहोचली आहे. इराणनं खबरदारीचा उपाय म्हणून संसदेचं सत्र संस्थगित केलं आहे. इराण मध्ये एकूण ३८८ रुग्णांना कोविड -१९ ची लागण झाली असून त्यापैकी ३४ जणांचा मृत्यू झाला आहे, यात इराणच्या २ संसद सदस्यांचा समावेश आहे.

मेक्सिको मध्ये प्रथमच कोविड -१९ ची लागण झाल्याचं तिथल्या आरोग्य मंत्रालयानं कळवलं आहे. इटली मधून परतलेल्या २ नागरिकांना संसर्ग झाल्याचं निदर्शनास आलं आहे. युरोपचा केंद्रबिंदू असलेल्या इटली मधेही आतापर्यंत ६५० जणांना कोरोना ची बाधा झाली असून १७ जण दगावले आहेत.

आइसलँड मध्ये देखील कोरोना विषाणू संसर्गाचा एक रुग्ण आढळला आहे. या पार्श्वभूमीवर पुढल्या महिन्यात सायप्रस इथं होणाऱ्या जागतिक नेमबाजी स्पर्धेतून भारतानं  माघार घेतली आहे. एकूणच  सद्यस्थितीत जगभरात विविध ठिकाणी आयोजित क्रीडास्पर्धा रद्द करण्याचा निर्णय आयोजक देशांनी घेतला आहे.

कोरोना विषाणू संसर्गामुळे जगभरात  आतापर्यंत ८३ हजार ६७० जण बाधित झाले असून दोन हजार ८६५ जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.या संसर्गामुळे आर्थिक आणि शेयर बाजार व्यवहारांना मोठा फटका बसला असून जागतिक आरोग्य संस्थेनं यासंदर्भात जागतिक स्तरावर जोखीम मूल्यांकनाचा स्तर वाढवला आहे.

Exit mobile version