नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : फेब्रुवारी २०२० मध्ये वस्तू आणि सेवाकरापोटी १ लाख ५ हजार कोटींहून अधिक रक्कम जमा झाली आहे. ही रक्कम फेब्रुवारी २०१९ मध्ये जमा झालेल्या रकमेपेक्षा आठ टक्क्यांनी जास्त आहे.
वस्तू आणि सेवा कराच्या एकूण संकलनापैकी केंद्रीय वस्तू आणि सेवाकराची रक्कम २० हजार कोटींहून अधिक आहे, राज्य वस्तू सेवा कराची रक्कम २७ हजार कोटींहून अधिक आहे, तर एकीकृत वस्तू आणि सेवाकरापोटी ४८ हजार कोटींहून अधिक रक्कम जमा झाली असल्याची माहिती केंद्रीय अर्थमंत्रालयानं दिली आहे.
फेब्रुवारी २०२० मध्ये देशांतर्गत उलाढालींतून संकलित झालेल्या वस्तू आणि सेवा करात फेब्रुवारी २०१९ च्या तुलनेत १२ टक्क्यांनी वाढ झाली असल्याची माहितीही अर्थमंत्रालयानं दिली आहे.