नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इराणमध्ये कोरोना विषाणूच्या संसर्गाचा उद्रेक झाल्याच्या पार्श्वभूमीवर तिथं अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे, अशी माहिती परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी दिली.
या भारतीयांना परत आणण्यासाठी आवश्यक ती माहिती प्रक्रिया सुरु करण्यासाठी सरकार ईराणी अधिका-यांबरोबर काम करत आहे. या संदर्भातल्या कामाच्या प्रगतीबाबतची माहिती संबंधितांना कळवण्याबाबत इराणमधल्या भारतीय राजदूताला सांगितलं असल्याची माहिती जयशंकर यांनी आपल्या ट्विटर संदेशात दिली आहे.
केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन आणि ज्येष्ठ नेते शशी थरुर यांनी इराणमध्ये अडकलेल्या केरळमधल्या मच्छिमारांसंदर्भात विचारलेल्या प्रश्नाबाबत ते माहिती देत होते. सर्व मच्छिमार ईराणमध्ये मच्छिमार कंपनीमध्ये काम करत होते. इराणमध्ये कोविड-१९ या आजारानं आतापर्यंत ५४ जणांचा मृत्यू झाला आहे.