Site icon साप्ताहिक एकच ध्येय

जनसंपर्कावरील राष्ट्रीय कार्यशाळा स्तुत्य उपक्रम; सोशल मीडियाचा प्रभावी वापर – डॉ. दिलीप पांढरपट्टे

सचिव तथा महासंचालक डॉ. दिलीप पांढरपट्टे यांची महाराष्ट्र परिचय केंद्राला भेट 

नवी दिल्ली : ‘शासनातील जनसंपर्क’ विषयावर राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन करून महाराष्ट्र परिचय केंद्राने राष्ट्रीय राजधानीत उत्तम पायंडा पाडला आहे. सोशल मीडियाचा प्रभावी उपयोग करून राज्य शासनाच्या प्रतिमा निर्मितीचे कार्य परिचय केंद्र उत्तम प्रकारे करीत असल्याच्या भावना व्यक्त करत माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव तथा महासंचालक डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी परिचय केंद्राच्या कार्याचे कौतुक केले.

डॉ. पांढरपट्टे यांनी आज परिचय केंद्राला भेट दिली. परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. माहिती अधिकारी अंजू निमसरकर ,उपसंपादक रितेश भुयार आणि कार्यालयातील कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

परिचय केंद्राच्या वतीने ‘शासनातील जनसंपर्क’ विषयावर राष्ट्रीय कार्यशाळा आयोजित करण्याचा उपक्रम स्तुत्य आहे. याद्वारे नवमाध्यमांच्या जगात जनसंपर्क क्षेत्रात करावयाचे बदल तसेच विविध राज्यांतील जनसंपर्क विषयक कार्यातील सकारात्मक उपक्रमांची देवाण-घेवाण होते असे डॉ. पांढरपट्टे म्हणाले.

महाराष्ट्र परिचय केंद्राचे तीन भाषेतील अधिकृत व प्रमाणित ट्विटर हँडल, फेसबुक पेजेस, युट्युब चॅनेल, ब्लॉग, इंस्टाग्राम, व्हॉटसॲप ग्रुप, एसएमएस सेवा आदींच्या माध्यमातून प्रभावीपणे करण्यात येणाऱ्या शासनाच्या प्रसिद्धी कार्याचेही डॉ. पांढरपट्टे यांनी विशेष कौतुक केले.

परिचय केंद्राच्या वतीने महाराष्ट्र सदनात कार्यरत खासदार समन्वय कक्षाद्वारे साधण्यात येणारा समन्वय, महाराष्ट्राबाहेरील मराठी मंडळांशी साधण्यात येणारा समन्वय, प्रकाशित करण्यात येणारी विविध प्रकाशने, दिल्लीस्थित मराठी व अन्य प्रादेशिक राष्ट्रीय प्रसारमाध्यमांशी साधण्यात येणारा समन्वय आणि परिचय केंद्रातर्फे राबविण्यात येणारे विविध उपक्रम याविषयीही श्री. कांबळे यांनी माहिती दिली.

कार्यालयाचे ग्रंथालय आणि विविध विभागांची पाहणी करून महाराष्ट्र परिचय केंद्राच्या कामाबद्दल डॉ. पांढरपट्टे यांनी समाधान व्यक्त केले व शुभेच्छा दिल्या.

Exit mobile version