मुंबई : मंत्रिमंडळ पायाभूत समितीने सायन-पनवेल महामार्गावरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पर्यायी मार्ग म्हणून तुर्भे ते खारघर भुयारी मार्ग करण्याचा निर्णय घेतला आहे. ठाणे-पनवेल वाहतूक, जेएनपीटीकडे जाणारी वाहतूक यांची कोंडी होत असल्याने ती सोडविण्यासाठी शासन सकारात्मक असून त्याबाबत जलद गतीने कार्यवाही सुरू असल्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत सांगितले.
तुर्भे ते खारघर या भुयारी मार्गाच्या कामाबाबत सदस्य गणेश नाईक यांनी प्रश्न उपस्थित केला होता. यास उत्तर देताना मंत्री श्री.शिंदे बोलत होते.
श्री.शिंदे म्हणाले, ठाणे-पनवेल-एक्सप्रेस वे – जेएनपीटी या भागातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी शासन कार्यरत आहे. यासाठी प्रकल्प मेसर्स स्टुप कन्सलल्टंट प्रा.लि. यांनी या प्रकल्पाची पूर्व सुसज्जता तपासण्यासाठी त्यांची नेमणूक केली. प्रधान सचिव यांच्या अध्यक्षतेखाली संबंधित प्रकल्पातील नऊ आराखड्यांचा अभ्यास करण्यात आला. त्यापैकी एका प्रकल्पास मान्यता देण्यात आली आहे. या प्रकल्पासाठी एमआयडीसी, एमएसआरडीसीने, सिडको यांनी ६०० कोटी आणि उर्वरित ६२२ कोटी कर्जरूपाने उभे करण्यात येणार आहे. हा प्रकल्प जलद गतीने पूर्ण करण्यासाठी सर्व सोयींनी युक्त अहवाल जलद गतीने सादर करण्यात येणार असल्याची माहितीही मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.