मुंबई : अन्न व औषध प्रशासन विभागांतर्गत येणाऱ्या अन्न चाचणी प्रयोगशाळेतील रिक्त असलेल्या तांत्रिक पदांच्या अनुषंगाने उच्चस्तरीय सचिव समितीची मान्यता घेण्याची कार्यवाही सुरू आहे. समितीच्या मान्यतेनंतर पुढील अधिवेशनाच्या आत पदभरती करण्यात येईल, असे अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी विधानपरिषदेत सांगितले.
सदस्य प्रा. अनिल सोले यांनी नागपूर येथील अन्न चाचणी प्रयोगशाळेतील रिक्त पदांविषयीची लक्षवेधी मांडली होती. या लक्षवेधीला उत्तर देताना श्री. शिंगणे बोलत होते. अन्न व औषध प्रशासनात विविध संवर्गात ११८३ पदे मंजूर आहेत. यात अन्न व औषध चाचणी प्रयोगशाळांतील एकूण १०३ तांत्रिक पदांचा समावेश आहे. या पदांसाठी उच्चस्तरीय सचिव समितीची मान्यता घेणे आवश्यक आहे. त्यानुसार समितीची मान्यता घेऊन पदभरती करण्यात येईल. अन्न चाचणी प्रयोगशाळा ही अन्न सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची प्रयोगशाळा आहे. त्यामुळे या प्रयोगशाळांचे सक्षमीकरण करण्यात येईल. सद्यस्थितीत नागपूर, मुंबई आणि औरंगाबाद येथे अन्न चाचणी प्रयोगशाळा कार्यरत आहेत. येत्या काळात नाशिक, पुणे येथेही अन्न चाचणी प्रयोगशाळा उभारण्यात येईल, असे श्री. शिंगणे यांनी विधानपरिषदेत सांगितले.
लक्षवेधीवरील चर्चेत सदस्य सर्वश्री रामदास आंबटकर, नागो गाणार, अंबादास दानवे, गिरीश व्यास यांनी भाग घेतला.