Site icon साप्ताहिक एकच ध्येय

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि अण्णाभाऊ साठे यांच्या मुंबईतील निवासस्थानी येत्या २ वर्षात होणार स्मारक

लोकांना परवडणारी घरे मिळावीत यासाठी शासनाचे विविध निर्णय, चाळी आणि झोपडपट्ट्यांचे कॉफिटेबल बुक प्रकाशित करणार – गृहनिर्माण मंत्री श्री. जितेंद्र आव्हाड

मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वास्तव्य लाभलेल्या परळ येथील चाळीतील निवासस्थानी त्यांचे स्मारक येत्या दोन वर्षात पूर्ण करण्यात येईल. तसेच अण्णा भाऊ साठे यांच्या निवासस्थानीही येत्या दोन वर्षात त्यांचे स्मारक विकसित करण्यात येईल. त्याचबरोबर मुंबईतील चाळी आणि झोपडपट्ट्यांचा इतिहास लोकांना माहीत व्हावा यासाठी यासंदर्भात कॉफिटेबल बुक प्रकाशित करण्यात येईल, अशी घोषणा गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी विधानसभेत केली.

पाण्याची गळती थांबविण्यासाठी गच्चीवर शेड बांधण्यास परवानगी
मुंबईतील म्हाडा इमारतींच्या गच्चीवर पावसाळ्यात होणाऱ्या पाण्याची गळती थांबविण्यासाठी इमारतीवर शेड बांधण्यास परवानगी देण्यात येईल, अशी घोषणाही त्यांनी यावेळी केली. मुंबई शहरातील इतर इमारतींबाबतही हा निर्णय करण्यासाठी महापालिकेला विनंती करून तसेच मुख्यमंत्र्यांशी बोलून निर्णय करण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

सदस्य सर्वश्री सुनील प्रभू, अमीन पटेल, रवींद्र वायकर, दीपक चव्हाण, झीशान सिद्दिकी, सौ.यामिनी जाधव आदींनी याबाबत नियम २९३ अन्वये मांडलेल्या प्रस्तावाला उत्तर देताना ते बोलत होते.

मुंबईत येत्या २ वर्षात ३० हजार घरे
मंत्री श्री आव्हाड म्हणाले की, गृहनिर्माण व्यवसायामध्ये सध्या मंदी आहे. लोकांना परवडणारी घरे उपलब्ध व्हावीत यासाठी शासन पावले उचलत आहे. सुमारे ३० हजार घरांच्या निर्मितीच्या प्रकल्पास येत्या १ मे च्या आत सुरुवात करण्यात येत आहे. पुढच्या दोन वर्षात ही घरे मुंबईत उपलब्ध होतील, असे त्यांनी यावेळी जाहीर केले.

एसईझेडसाठी घेण्यात आलेल्या पण त्या प्रयोजनासाठी वापरण्यात न आलेल्या जागा परत घेऊन त्या ठिकाणी परवडणारी घरे बांधण्याचा विचार करता येईल. राज्यात या जागा मिळाल्या तर ५ लाख घरे निर्माण करता येऊ शकतील. शासनाने आता म्हाडाच्या घरांमध्ये पोलीस कर्मचारी आणि शासनाच्या चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना प्रत्येकी १० टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. बीपीसीएलच्या ठिकाणीही सुमारे २२ हजार घरांचा प्रस्ताव आहे. पण सुरक्षेच्या कारणास्तव हा प्रकल्प प्रलंबित आहे. ही घरे पोलिसांना उपलब्ध करून दिल्यास सुरक्षेचा प्रश्न निर्माण होणार नाही. याबाबत केंद्राशी बोलणी करून पावले उचलली जातील, असे मंत्री श्री. आव्हाड यांनी सांगितले.

एसआरए योजनांनाही गती देण्यासाठी शासन विविध निर्णय घेत आहे. एसआरए प्रकल्पाच्या मंजुरीसाठी मोठा अडथळा असलेल्या परिशिष्ट २ संदर्भातील मान्यतेसाठी यापुढे म्हाडा किंवा मनपामध्ये जावे लागणार नाही. एसआरए इमारतीमध्येच एका छताखाली सेंट्रल एजन्सी तयार करुन त्याला ३० दिवसाच्या आत मान्यता देण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

एसआरएची घरे गुणवत्तापूर्ण होण्यासाठी गुणवत्ता नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आला आहे, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली. एसआरएमधून धार्मिक स्थळांचे पुनर्वसन करण्यासंदर्भातील निर्णयासाठी एसआरएचे मुख्य कार्यकारी अधिकारी, संबंधित पोलिस उपायुक्त व मनपा उपायुक्त यांची समिती निर्णय घेईल. यामुळे या प्रक्रियेतील दिरंगाई टळेल, असेही मंत्री श्री. आव्हाड यांनी यावेळी सांगितले. एसआरएमध्ये वित्त पुरवठा उपलब्ध व्हावा यासाठी बँका आणि एसआरए यांच्यामध्ये सांगड घातली जाईल, असेही त्यांनी यावेळी जाहीर केले.

कामाठीपुरा भागाचा भेंडीबाजारप्रमाणे विकास केला जाईल. सोशल इम्पॅक्ट फंडमधून यासाठी निधी मिळेल, असे त्यांनी यावेळी सांगितले. ठाण्यामध्ये गृहनिर्माण भवन बांधण्यात येत आहे. एमएमआर क्षेत्रातील एसआरए व म्हाडाचा विकास होईल. ठाण्यातही येत्या काळात ३० ते ३५ हजार परवडणारी घरे निर्माण करत आहोत, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

Exit mobile version