नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात आतापर्यंत कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे झालेल्या कोविड-19 या रोगाचे २८ रुग्ण आढळले आहेत अशी माहिती, केंद्रीय आरोग्यमंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांनी दिली आहे. नवी दिल्लीत यासंदर्भात आज झालेल्या उच्चस्तरीय परिक्षणात्मक बैठकीनंतर ते वार्ताहरांशी बोलत होते.
या २८ जणांमधे सोळा इटालियन आणि दोन भारतीय दिल्लीत, आग-यात सहा, तेलंगणात एक आणि केरळमधल्या तिघांचा समावेश आहे, यापैकी केरळमधले तिघेजण बरे झाले आहेत, असं त्यांनी सांगितलं. कोरोना विषाणूच्या तपासणीसाठी देशभरात १५ प्रयोगशाळा स्थापन केल्या असून, इतर सोळा प्रयोगशाळा लवकरच कार्यान्वित होतील, अशी माहिती त्यांनी दिली. देशातल्या सर्व विमानतळांवर परदेशातून येणा-या सर्व प्रवाशांची कोरोना चाचणी करण्याचा निर्णयही सरकारनं घेतला आहे, असं हर्षवर्धन यांनी स्पष्ट केलं.