Site icon साप्ताहिक एकच ध्येय

महाराष्ट्रात कोरोना विषाणूची लागण झालेली नाही नागरिकांनी घाबरु नये – राजेश टोपे

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणूची लागण झालेला एकही रुग्ण महाराष्ट्रात आढळलेला नाही असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज विधानपरिषदेत सांगितलं.

कोरोना संदर्भात झालेल्या चर्चेला ते उत्तर देत होते. नागरिकांनी घाबरु नये असं आवाहन त्यांनी केलं. रोगप्रतिकारशक्ती वाढवली तर कोरोना बरा होऊ शकतो. कोरोनामुळे चीनमधे मृत्यू झालेल्या लोकांचं प्रमाण अडीच ते तीन टक्के आहे असं ते म्हणाले.

कोरोना विषाणू संक्रमणावर अद्याप औषध आणि लस आलेली नाही त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढवणं स्वच्छता राखणं हे प्रतिबंधात्मक उपाय असल्याचं टोपे यांनी सांगितलं. खोकला, सर्दी, ताप, अंगदुखी ही कोरोनाची प्राथमिक लक्षणं आहेत मात्र या आजारानं गंभीर रुप धारण केलं तर न्यूमोनिया होऊ शकतो आणि मुत्रपिंड निकामी होऊ शकतात अशी माहिती त्यांनी दिली.

विमानतळ आणि बंदरांवर थर्मल तपासणी सुरु आहे. राज्यात ५५१ विमानांची तपासणी झाली असून ६५ हजार प्रवाशांची थर्मल तपासणी करण्यात आली आहे. बंदरांवर ३० जहाजं आणि ६७३ जणांची थर्मल तपासणी करण्यात आली आहे. यात १५२ प्रवासी संशयास्पद आढळले त्यापैकी १४९ जणांना लागण झाली नसल्याचं चाचणीत आढळलं आहे.

तीनजणांचा वैद्यकीय अहवाल अद्याप प्रलंबित आहे.

Exit mobile version