नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या महिला ट्वेंटी-ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत उद्या सिडनी इथं पहिल्या उपांत्य सामन्यात भारताची गाठ इंग्लंडशी पडणार आहे. भारतीय प्रमाण वेळेनुसार सकाळी साडेनऊ वाजता सामन्याला सुरुवात होईल.
याआधी भारतानं कधीही या स्पर्धेची अंतिम फेरी गाठलेली नसून, ट्वेंटी-ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेत त्यांनी इंग्लंडला हरवलेलही नाही. त्यामुळे भारतीय महिला संघाला इतिहास नव्यानं लिहायचा असेल तर उद्या उपांत्य फेरीत इंग्लंडला हरवून अंतिम फेरी गाठावी लागेल. मागच्या खेपेला, 2018 च्या ट्वेंटी-ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेत भारत इंग्लंड विरुद्ध उपांत्य फेरीतच पराभूत झाला होता.
दुसऱ्या उपांत्य सामन्यात उद्या दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया संघांमध्ये सामना होईल. हा सामना भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी दीड वाजता सुरू होईल. अंतिम सामना मेलबर्न इथं येत्या रविवारी दुपारी साडेबारा वाजता सुरू होईल. विशेष म्हणजे अंतिम फेरीचा सामना आंतरराष्ट्रीय महिला दिनी होत आहे.