मुंबई : होळी उत्सवात रासायनिक रंगांमुळे होणारे घातक परिणाम लक्षात घेऊन नागरिकांनी नैसर्गिक रंगांचा वापर करावा, असे आवाहन पर्यावरण विभाग आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने केले आहे.
पर्यावरणपूरक होळीसाठी मंत्र्यांचे आवाहन
राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे यांनीही या मोहिमेत पुढाकार घेतला असून पर्यावरणपूरक होळी साजरी करण्यासाठी त्यांनी सर्व आमदारांना एक स्नेहपत्र पाठवले आहे. बदलत्या हवामानामुळे, बदलत्या ऋतुचक्रामुळे होत असलेले बदल लक्षात घेता सर्वांनी पर्यावरणपूरक रंगोत्सव साजरा करावा, अशा पर्यावरणस्नेही शुभेच्छा या स्नेहपत्राद्वारे दिल्या आहेत. लोकप्रतिनिधी हे समृद्ध समाजनिर्मितीचे विश्वस्त आहेत, त्यांनी निसर्ग संवर्धनासाठी पुढाकार घेण्याची सदिच्छा या स्नेहपत्रात व्यक्त करण्यात आली आहे.
आमदारांना मिळणार नैसर्गिक रंगांची भेट
मंत्री श्री. ठाकरे व श्री. बनसोडे यांच्या संकल्पनेतून विधानसभा व विधानपरिषदेच्या सर्व सदस्यांना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व पर्यावरण विभागाच्या वतीने नैसर्गिक रंगांचे वाटप करण्यात येणार आहे. होळी उत्सवात रासायनिक रंगांमुळे होणारे घातक परिणाम लक्षात घेऊन महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व पर्यावरण विभागाच्या वतीने गेल्या आठ वर्षापासून पर्यावरणस्नेही होळी साजरी करण्यासाठी व्यापक जनजागृती केली जात आहे. त्यामुळे दरवर्षी पर्यावरणपूरक होळी साजरी करण्याचे प्रमाण वाढत चालले असून नैसर्गिक रंगांची मागणी देखील वाढू लागली आहे.
मंत्रालयात नैसर्गिक रंगांचा विक्री स्टॉल
मंत्रालयात राज्याच्या कानाकोपऱ्यातून असंख्य नागरिक कामानिमित्त येत असतात. या नागरिकांना पर्यावरणपूरक नैसर्गिक रंग उपलब्ध व्हावेत याकरिता राज्य शासनाचा पर्यावरण विभाग व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने नैसर्गिक रंगाचे प्रदर्शन व विक्री स्टॉल मंत्रालय येथे गुरुवार, दि.०५ मार्च २०२० रोजी प्रदर्शित करण्यात येणार आहे. मंत्रालयातील कर्मचारी व येथे येणारे अभ्यागत, नागरिक यांना नैसर्गिक रंग खरेदी करता येतील.