मुंबई : तरूण वर्ग शरीर बनविण्यासाठी स्टिरॉईडचे अतिसेवन करून मृत्यूस बळी पडत असल्याच्या घटना निदर्शनास आल्या आहेत. विधी व न्याय विभागाच्या माध्यमातून तज्ञांच्या समितीमार्फत अभ्यास करून राज्य शासन डीनीट्रो फिनॉल आणि स्टिरॉईड या उत्तेजित द्रव्यांच्या ऑनलाईन आणि दुकानात विक्री प्रतिबंधासंदर्भात नवीन कायदा करणार असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी आज विधानसभेत सांगितले.
राष्ट्रीय पातळीवर शरीरसौष्ठव स्पर्धेत अव्वल येण्यासाठी उत्तेजित द्रव्यांच्या अतिसेवनाने मृत्यू होत असल्याबाबत सदस्य अमित साटम यांनी लक्षवेधी उपस्थित केली होती त्यास उत्तर देताना मंत्री श्री. शिंगणे बोलत होते.
मंत्री श्री. शिंगणे म्हणाले, शरीरवाढीसाठी, गर्भपातासाठीची औषधे, स्टिरॉईड, डायनायट्रोफिनॉल, अमिनो ॲसिड, गिलेटीन पावडरचे घटक असलेले औषध यांचा गैरवापर तसेच ऑनलाईन खरेदी-विक्री या सर्वांवर कायदेशीर बंदी आणून संबंधितांवर कठोर कारवाई करण्यासाठी शासन सकारात्मक असून उत्पादक आणि विक्रीसंदर्भात अधिक कडक तरतुदी करण्यात येतील.
राज्यात व्यायामशाळेत पूरक आहाराच्या माध्यमातून स्टिरॉईडचे घटक असलेले पदार्थ किंवा उत्तेजक घटक वितरित केले जाते. वजन वाढणे किंवा कमी करणेसाठी ही द्रव्ये दिली जातात. यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या माध्यमातून अन्न निरीक्षक व औषध निरीक्षक तसेच पोलीस अधिकारी यांच्यासमवेत राज्यातील सर्व व्यायामशाळांची तपासणी पुढील सहा महिन्यात करण्यात येईल. अशा प्रकारचे घटना आढळल्यास संबंधित व्यायाम शाळेवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
मुंबई शहरात अन्न व प्रशासन विभागाने व्ही प्रोटीनबाबत विशेष मोहीम राबविली होती. त्याचे २६ नमुने नमुने तपासणीसाठी दिले आहेत. अहवाल सकारात्मक आल्यास त्यानंतर कारवाई केली जाईल.
ठाणे व मुंब्रा येथे नुकतेच दोन जणांचा या उत्तेजक पदार्थांच्या सेवनाने मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. मात्र, पोलिसांनी अकस्मात मृत्यू अशी नोंद केल्याने यासंदर्भात गृह विभागाशी समन्वय साधून योग्य कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती मंत्री श्री. शिंगणे यांनी दिली.
यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री सुधीर मुनगंटीवर, बबनराव पाचपुते, आशिष शेलार, कॅप्टन तमिल सेल्वन, प्रताप सरनाईक, राम कदम, जयकुमार रावल आदींनी भाग घेतला.