नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सदनाचा अवमान करुन बेजबाबदार वर्तणूक केल्याबद्दल काँग्रेसच्या ७ सदस्यांना आज, अर्थसकल्पीय अधिवेशन पूर्ण होईपर्यत निलंबित केलं आहे. लोकसभा अध्यक्षांनी काँग्रेसच्या या सदस्यांच बेजबाबदार वर्तन घोषित केल्यानंतर संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी नियम ३७४ च्या आधारे हा प्रस्ताव सादर केला.
सदनात खाण कायदा दुरुस्ती विधेयक २०२० वर चर्चा सुरु असताना या सदस्यांनी त्याचे कागद फाडून टाकले. गौरव गोगोई, टी एन प्रथापन, डीन कुरीआकोस, मानिकम टागोर, गुरजीत सिंग औजला, राजमोहन ऊन्निथन आणि बेनी बेहानन यांना निलंबित केल्याचं पीठासन अध्यक्ष मिनाक्षी लेखी यांनी जाहीर केलं.
हा प्रस्ताव आवाजी मतदानानं मान्य झाला. आणि अध्यक्षांनी या सदस्यांना त्वरित सदनातून निघून जायची आज्ञा केली, त्यानंतर कामकाज दिवसभरासाठी तहकूब केलं गेलं.