मुंबई : राज्यातील अंमली पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी राज्य शासन कडक उपाययोजना करणार असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासाला दिली.
श्री. देशमुख म्हणाले, पोलीस अधीक्षक, रत्नागिरी यांच्या कार्यक्षेत्रात हरियाणा व राजस्थानमधील तीन व्यक्तींना रत्नागिरी एमआयडीसी येथील पडक्या इमारतीमध्ये कोकेन जवळ बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. मात्र त्यांनी बाळगलेला माल हा अंमली पदार्थ नसल्याचा अहवाल प्रयोगशाळेने दिल्याने त्यांना सोडून देण्यात आले होते. या प्रकरणाची महानिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करण्यात येईल. अशी घोषणाही त्यांनी यावेळी केली. सन 2019 मध्ये अंमली पदार्थ विरोधी कक्ष व मुंबई पोलिसांनी एकूण 11 हजार 706 गुन्हे नोंदविण्यात आलेले आहेत असे सांगून विविध ठिकाणी अंमली पदार्थांच्या विरोधात केलेल्या कारवाईची माहिती त्यांनी सभागृहाला दिली.
उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने सदस्य सर्वश्री आर्कि. अनंत गाडगीळ, भाई जगताप, डॉ. रणजीत देशमुख, हेमंत टकले, महादेव जानकर, सुरेश धस, श्रीमती हुस्नबानो खलिफे आदिंनी प्रश्न उपस्थित केला होता.