मुंबई : मौजे वाघोशी, ता. सुधागड, जि. रायगड येथील जमिनी खरेदी करताना झालेल्या अनियमिततेची औरंगाबाद आयुक्तांमार्फत चौकशी करून येत्या 31 मेपर्यंत कारवाई पूर्ण केली जाईल, असे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासाला सांगितले.
मौजे वाघोशी, ता. सुधागड, जि. रायगड येथील जमिनी जितेंद्र तातेड व त्यांच्या कुटुंबियांनी खरेदी करताना शेतकरी असल्याचा दाखला पुरावा म्हणून सादर केला होता. या दाखल्याची सत्यता पडताळणी केली असता हे कुटुंब शेतकरी नाही असे प्रथमदर्शनी लक्षात आले आहे. या कुटुंबियांकडून या जमिनी दुसऱ्या संस्थेने विकत घेतल्या होत्या. या सर्व व्यवहारात अनियमितता झाल्याचे सकृतदर्शनी लक्षात आले आहे. या सर्व प्रकाराची चौकशी करण्यासाठी आधी कोकण विभागीय आयुक्तांमार्फत चौकशीचे आदेश दिले होते. मात्र पारदर्शक चौकशी व्हावी यासाठी सदस्यांनी मागणी केल्यानंतर औरंगाबाद आयुक्त सुनिल केंद्रेकर यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी करण्याचे श्री. थोरात यांनी मान्य केले.
या विषयावरील प्रश्न सदस्य प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी उपस्थित केला होता. या चर्चेत सदस्य सर्वश्री नागो गाणार, भाई जगताप, विनायक मेटे, जयंत पाटील, प्रवीण दरेकर, अमरेंद्र राजूरकर यांनी उपप्रश्न विचारत सहभाग नोंदविला.