मुंबई : राज्यातील नद्या पुनरुज्जीवित करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. राज्यातील 21 नद्या पुनरुज्जीवित करण्यासाठी आवश्यक निधीचा प्रस्ताव नीति आयोगाकडे पाठविण्यात आला असल्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी विधानपरिषदेत सांगितले.
सदस्य गिरीशचंद्र व्यास यांनी भंडारा जिल्ह्यातील वैनगंगा नदीच्या प्रदूषणाविषयीची लक्षवेधी उपस्थित केली होती. या लक्षवेधीला उत्तर देताना श्री. ठाकरे बोलत होते. नद्यांच्या पुनरुज्जीवित करण्यास प्राधान्य देण्यात येणार आहे. यासाठी विविध उपाययोजनांचा अवलंब करण्यात येत आहे. वैनगंगा नदीच्या दूषित पाण्यामुळे बाधित नदीकाठच्या गावास शुद्ध पाणी उपलब्ध व्हावे या दृष्टिकोनातून परिसरातील ४५ गावांमध्ये जलशुद्धीकरण केंद्र बसविण्यास मंजुरी मिळाली आहे. त्यानुसार ३१ गावात जलशुद्धीकरण यंत्रणा बसविण्यात आल्या आहेत. उर्वरित १३ गावांसाठीचे प्रस्ताव सादर करण्यात आले आहेत. वैनगंगा नदीच्या प्रदूषणासंदर्भात या भागाचा दैारा करण्यात येणार आहे. यासंदर्भात एक बैठकही घेण्यात येणार असल्याचे आदित्य ठाकरे यांनी यावेळी सांगितले.
यावेळी झालेल्या चर्चेत विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, सदस्य सर्वश्री डॉ.परिणय फुके, रामदास आंबटकर यांनी भाग घेतला.