मुंबई : अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत सादर केलेला अर्थसंकल्प हा शेतकरी, कष्टकरी, आदिवासी, महिला व युवक अशा सर्व घटकांना दिलासा देणारा अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पाचे मी स्वागत करतो अशी प्रतिक्रिया राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांनी व्यक्त केली आहे.
मंत्री श्री.राठोड म्हणाले, या अर्थसंकल्पात 2020 – 21 या वर्षात वन विभागासाठी 1 हजार 630 कोटी रुपयांचा नियतव्यय प्रस्तावित करण्यात आला आहे. त्या माध्यमातून राज्यात वनसंवर्धन, वृक्षलागवड, वन्यजीव – मानव संघर्ष कमी करणे, सामाजिक वनीकरणाची कामे तसेच वन पर्यटनाला चालना देणे यासारखे उपक्रम राबविण्यात येतील अशी माहितीही मंत्री श्री. राठोड यांनी दिली.
या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना, अतिवृष्टी, पूर परिस्थितीमुळे तसेच अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीबद्दल भरपाई, पीक विमा योजनेत सुधारणा यासारखे क्रांतिकारी निर्णय घेण्यात आले आहेत. आरोग्य सुविधांमध्ये वाढ करण्यात आली आहे तसेच गरिबांना दहा रुपयांमध्ये भोजन देणाऱ्या शिवभोजन थाळीच्या लाभार्थींची संख्या दुप्पट करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. या निर्णयाबद्दल मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार मानतो असेही मंत्री श्री.राठोड यांनी म्हटले आहे.