Site icon साप्ताहिक एकच ध्येय

प्रधानमंत्र्यांनी कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजनांचा घेतला आढावा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात झालेला कोरोना विषाणूचा संसर्ग आणि त्याचा सामना करण्यासाठी विविध विभागांनी केलेल्या कार्यवाहीचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज एका बैठकीत आढावा घेतला. नवी दिल्लीत झालेल्या या बैठकीला, आरोग्यमंत्री हर्ष वर्धन आणि परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्यासह इतर मंत्री उपस्थित होते. या विभागाने आतापर्यंत केलेल्या उपाययोजनांचा प्रधानमंत्री कौतुक केलं.

संभाव्य परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी आपण सर्वांनी सज्ज रहायला हवं असं सांगून ते म्हणाले की सर्व विभागांनी एकमेकांमध्ये समन्वय साधून जनतेत या रोगाबाबत जनजागृती आणि खबरदारीचे उपाय योजण्यासाठी काम करावं. संबंधित अधिकाऱ्यांनी या रोगाच्या निवारणासाठी जगभरात उपलब्ध असलेले सर्वोत्तम उपाय अवलंबावेत अशी सूचना त्यांनी केली.

लोकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळावं, तसच या विषाणू संसर्गापासून लांब राहण्यासाठी काय करावं आणि काय करू नये याबाबत जनतेला सातत्यानं माहिती देत रहावं असही ते म्हणाले. कोरोना विषाणूचा झपाट्यानं संसर्ग झाल्यास त्या भागात कुठल्या ठिकाणी विलगीकरण केंद्र स्थापन करता येतील, याचा शोध घेण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

कोरोना संसर्गाचा सामना करण्यासाठी आवश्यक असलेली औषधं, तसंच इतर साधन सामुग्रीचा पुरेसा साठा आहे की नाही याचा आढावाही या बैठकीत घेण्यात आला.

Exit mobile version