मुंबई : महिला आर्थिक विकास महामंडळ जिल्हा कार्यालय मुंबई अंतर्गत तनिष्का लोकसंचालित साधन केंद्र, धारावी येथे जिल्हा नियोजन समिती यांच्या नाविन्यपूर्ण उपक्रमातून सुरू करण्यात आलेल्या तनिष्का गारमेंट युनिट व तेजस्विनी फॅशनचे उद्घाटन शालेय शिक्षणमंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माविमच्या अध्यक्ष ज्योती ठाकरे उपस्थित होत्या.
तनिष्का लोकसंचालित साधन केंद्र
मुंबईमध्ये धारावी हे गारमेंट युनिटचे हब म्हणून प्रसिद्ध आहे . त्या संकल्पनेला अनुसरून मंत्री प्रा. गायकवाड यांच्या मार्गदर्शनात जिल्हा नियोजन समिती यांच्याकडे नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत गारमेंट युनिटचा प्रस्ताव सादर केला होता. या प्रस्तावासाठी एकूण २० लाख ५० हजार एवढ्या रकमेची मागणी करण्यात आली होती. त्यातील १५ लाख १० हजार एवढा निधी जिल्हा नियोजन समितीकडून नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत मंजूर करण्यात आला.
कापडी पिशव्या मोठ्या प्रमाणात तयार करण्यासाठी स्वतंत्र युनिटची स्थापना करण्यात येत आहे. युनिटसाठी शिलाई मशीन, कापड कटिंग मशीन, ओवर लॉक मशीन घेण्यात आली आहेत . हे युनिट २५ महिला एकत्र येऊन सुरू करण्यात आले आहे. यासाठी त्यांचे बँकेत खाते सुरु करण्यात आले आहे. त्या युनिटमधील सर्व महिलांकडे कपडा कटिंग, शिलाई व छपाईची सर्वस्वी जबाबदारी असेल . तसेच प्रामुख्याने जागेचे भाडे, वीज बिल व इतर देखभाल असे एकूण २५ हजार रुपये इतकी अंदाजपत्रकीय तरतूद करण्यात आली आहे . ह्या महिलांमध्ये मार्केटिंग, पॅकिंग, लेबलिंग, टेलरिंग असे विभाग तयार करण्यात आले असून त्यांच्यावर त्यांची सर्वस्वी जबाबदारी देण्यात आली आहे . मुंबई जिल्ह्यामध्ये या युनिटच्या माध्यमातून गरजू महिलांना सातत्यपूर्वक व्यवसाय मिळेल. तसेच महिलांना प्रतिमहा पाच ते सहा हजार इतके उत्पन्न मिळेल. तनिष्का गारमेंट युनिटमार्फत CMRC ला शाश्वत असा उपक्रम सुरू करण्याचे नियोजन केले आहे.