Site icon साप्ताहिक एकच ध्येय

जागतिक महिला दिनानिमित्त राज्यात सुमारे २५ हजार पोलिसांची तपासणी

महिला पोलीस कर्मचाऱ्यांची कॅन्सरविषयक नियमित तपासणी

गायनोकॉलॉजिस्ट सोसायटीच्या सहकार्याने करण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना

मुंबई, : पोलीस दलातील महिला अधिकारी व कर्मचारी यांच्या आरोग्याच्या दृष्टीने विशेषत: सर्व प्रकारच्या कॅन्सरची तपासणी तसेच चांगल्या आरोग्यासाठी नियमित तपासणी करण्यासाठी स्त्री रोग तज्ज्ञांच्या फेडरेशन ऑफ गायनोकॉलॉजिस्ट सोसायटी ऑफ इंडिया (फॉग्जी) च्या समन्वयाने कार्यक्रम हाती घेण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संबंधिताना सुचना दिल्या आहेत.

चर्नी रोड येथील पुरंदरे हॉस्पिटल येथे आज या आरोग्य तपासणी उपक्रमाचा शुभारंभ मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे यांच्या हस्ते झाला. याप्रसंगी फॉग्जीचे माजी अध्यक्ष डॉ. सी.एन. पुरंदरे, महाराष्ट्र शाखेचे अध्यक्ष डॉ.जयदीप टांक, सचिव डॉ. माधुरी पटेल, पदाधिकारी डॉ.सुवर्णा खाडिलकर, डॉ.सरिता भालेराव, डॉ. कोमल चव्हाण, डॉ. परीक्षित टांक, डॉ. अनुजा पुरंदरे, डॉ. शेखर पुरंदरे, डॉ. सुजाता दळवी आदींची उपस्थिती होती.

आज जागतिक महिला दिनानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रातून तसेच फॉग्जीच्या मुंबई, ठाणे, भाईंदर शाखेने मिळून सुमारे २५ हजार  पोलीस कर्मचाऱ्यांची तसेच राज्य राखीव दलातील महिला पोलिसांची कॅन्सरविषयक तपासणी केली.

जागतिक महिला दिनानिमित्त महिला पोलीस कर्मचाऱ्यांच्या आरोग्य तपासणीचा हा उपक्रम राबविण्याची कल्पना फॉग्जीचे विद्यमान अध्यक्ष अल्पेश गांधी यांची असून महाराष्ट्रातील 33 शाखांमधून आज पोलीस महिला कर्मचाऱ्यांची आरोग्य विषयक तपासणी आणि कॅन्सरपासून कसा प्रतिबंध करायचा यावर त्यांना मार्गदर्शन असे कार्यक्रम घेण्यात आले अशी माहिती महाराष्ट्राच्या संघटक डॉ गिरीजा वाघ यांनी दिली. फॉग्जीच्या देशभरातील 300 सदस्य संस्थापैकी 230 संस्थानी त्यांच्या भागात सदर शिबिरे विनामुल्य आयोजित केली होती.

महिलांमधील स्तनाचा कर्करोग होण्याचे प्रमाण वाढत असून गर्भाशयाचा तसेच इतर प्रकारचे कर्करोग वाढत आहेत. पोलीस दलातील महिलांना आपले कर्तव्य बजावताना आरोग्याची काळजी घेता येत नाही. त्यामुळे त्यांच्यासाठी खास अशा प्रकारे नियमित तपासणी करण्याचा उपक्रम राज्य शासन फॉग्जीच्या सहकार्याने करू शकते का ते पाहण्याच्या सुचना देऊन या उपक्रमास मुख्यमंत्र्यांनी शुभेच्छा दिल्याचे मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे यांनी यावेळी सांगितले.

हा उपक्रम राबवून पोलिसांच्या धकाधकीच्या जीवनात त्यांना आरोग्य सेवा आणि सल्ला देण्याचे काम फॉग्जीने केले आणि यामध्ये पोलीस महासंचालक सुबोध कुमार जायसवाल, पोलीस आयुक्त परम बीर सिंह तसेच राज्यातील सर्व पोलीस अधिकाऱ्यांनी सहकार्य केले याबद्धल मुख्यमंत्र्यांनी त्यांना देखील धन्यवाद दिले तसेच फॉग्जीचे अध्यक्ष अल्पेश गांधी, डॉ गिरीजा वाघ आणि सर्व डॉक्टर्सचे कौतुकही केले.

Exit mobile version