नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महाराष्ट्राची लोककला इथली संस्कृती सर्वश्रुत आहे. आजही विविध समाजातील नागरिक आपल्या परंपरा जपत आहेत. लोप पावत चाललेल्या गोरमाटी बंजारा भरत कामाला पुन्हा एकदा उभारी देण्याकरता बीड जिल्हयातील विजया पवार प्रयत्न करत असुन त्याला केंद्र सरकारनेही मदतीचा हात दिला आहे.
राज्यात मराठवाडा परिसरात बंजारा समाज हा मोठया संख्येने वास्तव्यास आहे. वर्षानुवर्षै या परिसरात राहत असल्याने समाजाच्या विविध परंपरा आजही ते जोपासत आहे. विजया पवार यांनी हडप्पानी घुर बंजारा महिला कला विकास संस्थेच्या माध्यमातुन लोप पावत चाललेल्या बंजारा हस्तकला जिंवत ठेवण्याकरता २००४ ला सुरवात केली बीड मधील बजारा वस्तीमध्ये जाऊन त्या महिलांना एकत्र करत बंजारा हस्तकला भरत काम सुरु केले.
खरं तर ही कला हडप्पा, मोहोजदडो पासुन सुरु असुन हल्लीच्या काळात ही कला अडगळीत सापडली होती. त्याला पुन्हा एकदा जिंवत करण्याचे काम विजया पवार करत आहे. एक हजार महिलांना आतापर्यंत याचे ट्रेनिंग दिले असुन केंद्र सरकारच्या टेक्सस्टाईल विभागाने एक कोटी चे अनुदान ट्रेनिंग, प्रचार, विविध साधने घेण्याकरता दिले असुन जपान कौन्सिलनेही या हस्तकलेची विशेष दखल घेत त्यांनीही ट्रेनिंग सेंटर उभा करण्याकरता ५५ लाख रुपये दिले आहेत.
बंजारा समाजात या हस्तकलेला अनन्य साधारण महत्व आहे. एखादी कलाकृती करण्याकरता जवळपास पाच ते सहा महिने लागतात. हाताच्या माध्यमातुन हे काम केले जात असल्याने कले सोबत वेळेलाही तितकेच महत्त्व या कलेला दिले जाते. अशी कला, संस्कृती जोपासण्याकरता या महिलांच्या हाताला बळ देण्याची गरज आहे अस मत पवार यांनी व्यक्त करत ही कला वृध्दिंगत करणा-यासाठी आपण कायम प्रयत्न करू अस सांगितले.