Site icon साप्ताहिक एकच ध्येय

मुंबईतील वाहतूक व्यवस्थेबाबत सरकार संवेदनशील – परिवहनमंत्री दिवाकर रावते

मुंबई : सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट करणे ही मुंबईसाठी महत्त्वाची बाब असून त्यादृष्टीने राज्य शासन संवेदनशील आहे. मेट्रोची गतीने चाललेली कामे, कोस्टल रोड, ट्रान्सहार्बर रोड आदी प्रकल्पातून शहरातील वाहतूक कोंडीवर उपाययोजना करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असे परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी विधानसभेत सांगितले.

सभागृहाचे सदस्य अमीन पटेल यांनी मांडलेल्या अशासकीय ठरावाला उत्तर देताना श्री. रावते बोलत होते. या ठरावावरील चर्चेत सदस्य सुनील शिंदे यांनीही सहभाग घेतला.

श्री.रावते म्हणाले की, मुंबईत सव्वाकोटी लोकसंख्या आणि रोज बाहेरून कामासाठी प्रवास करणारी (फ्लोटिंग पॉप्युलेशन) सुमारे 70 लाख लोकसंख्या यामुळे शहरातील वाहतूक व्यवस्थेवर ताण येत आहे. शहरातील वाहनांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली असून मार्च 2019 मध्ये 3 कोटी 29 लाख इतकी वाहनसंख्या झाली आहे. गेल्या दोन महिन्यात 25 लाख 38 हजार नवी वाहने मुंबईच्या रस्त्यावर आली आहेत. त्यामुळे रहदारीवर विपरीत परिणाम होऊन वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते. मात्र, राज्य शासन यावर उपाययोजना करीत आहे.

श्री. रावते म्हणाले की, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट केल्याशिवाय लोक खासगी वाहनांच्या वापरावर अवलंबून राहणार नाहीत. त्यादृष्टीने बृहन्मुंबई महानगरपालिकेने काही अटींवर ‘बेस्ट’ वाहतूक सेवेला दरमहा शंभर कोटी रूपये देण्याचा निर्णय घेतला आहे. सार्वजनिक वाहतुकीला चालना देण्यासाठी रिक्षा परवाने खुले केल्याने 55 हजार रिक्षा शहरात वाढल्या. त्यामुळे रोजगारही निर्माण झाला. शहरातील रस्त्यांची रुंदी वाढविणे गरजेचे असून त्यामध्ये अडथळे असले तरी प्रसंगी कठोर निर्णय घ्यावे लागतील.

मेट्रो सेवेचे विस्तारीकरण करण्यात येत असून 2022 पर्यंत हे काम पूर्ण करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. कोस्टल रोड, शिवडी- न्हावा शेवा ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्प, वांद्रे-वर्सोवा सागरी जोड सेतू आदी प्रकल्प शहरातील जलद वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरतील. बस वाहतूक सेवा, उपनगरीय  रेल्वे, मेट्रो आणि मोनो या सर्व वाहतुकीसाठी एकात्मिक तिकीट यंत्रणा सुरु करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. यामुळे नागरिक खासगी वाहनांच्या वापराऐवजी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला पसंती देतील, अशी आशाही श्री. रावते यांनी व्यक्त केली.

मुंबईत सुरक्षेच्या दृष्टीकोनातून बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा बहुआयामी उपयोग होत असून आता गुन्हे उघडकीस येण्याबरोबरच वाहतूक यंत्रणेलाही त्यांचा उपयोग होत आहे. वाहतुकीचे नियम तोडणाऱ्यांना रस्त्यावर थांबवून कारवाई करण्याऐवजी सीसीटीव्हीतून वाहनांचा क्रमांक मिळाल्याने वाहनमालकाला थेट घरी चलन पाठविण्यात येते. त्यामुळेही वाहतुकीला होणारा अडथळा कमी झाला आहे, असेही श्री. रावते म्हणाले.

Exit mobile version