नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेद्र मोदी यांनी आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. आपल्या नारीशक्तीचं चैतन्य आणि कार्यसिद्धी यांना आम्ही नमन करतो असं मोदी यांनी आपल्या ट्विट संदेशात म्हटलं आहे.
प्रधानमंत्री आज दिवसभरासाठी आपल्या ट्विट खात्यावरुन रजा घेत आहेत. आज दिवसभर नारी शक्ती सन्मानप्राप्त सात यशस्विनी या ट्विटर खात्यावरुन स्वतःच्या आयुष्याच्या प्रवासाचा आलेख मांडतील तसंच प्रधानंमत्र्यांच्या समाजमाध्यम खात्यांवरुन या यशस्वी महिला कदाचित जनतेशी संवाद साधतील.
देशाच्या सर्वच कानाकोपऱ्यात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या यशस्वी महिलांची संख्या मोठी असून त्यांनी अत्यंत वैविधघ्यपूर्ण अशा क्षेत्रांमध्ये महान कार्य केलं आहे. या महिलांचे संघर्ष आणि महत्त्वाकांक्षा यांमधून लाखोंना प्रेरणा मिळत आहे, असं मोदी म्हणाले.
अशा महिलांचं यश सातत्यानं साजरं करुन त्यापासून शिकवण मिळवावी असं आवाहन त्यांनी देशवासियांना केलं आहे. प्रधानमंत्र्यांच्या ट्विटर खात्यावरुन स्वतःचा जीवनप्रवासाची हकिकत प्रसारित करताना नारी शक्ती पुरस्कारप्राप्त स्नेहा मोहनदॉस यांनी बेघर लोकांना अन्न देण्याची प्रेरणा आपल्या आईकडून मिळाल्याचं म्हटलं आहे.
मोहनदॉस यांनी अन्नबँक नावाची चळवळ सुरु केली आहे. देशात आणि परदेशातही भूकमुक्तीसाठी कार्य करणाऱ्या अनेक स्वयंसेवकांसोबत आपण काम केल्याचं मोहनदॉस यांनी सांगितलं. या कार्यामध्ये पुढे येऊन हातभार लावण्यासाठी देशवासियांना विशेषतः महिलांना प्रेरणा देणाची इच्छा स्नेहा मोहनदॉस यांनी व्यक्त केली.
आपल्या संपूर्ण पृथ्वीला भूकमुक्त करण्यासाठी प्रत्येकानं किमान एका भूकेल्याला अन्न द्यावं असं आवाहन मोहनदॉस यांनी केलं आहे. दिव्यांगासाठी कार्य करणाऱ्या कार्यकर्त्या आणि प्रेरक वक्त्या डॉ.मालविका अय्यर यांनी अंपगत्वा संबंधिच्या दृष्टीकोनात बदल करणे म्हणजेच याबाबतची अर्धी लढाई जिकणं असं म्हटलं आहे.
अंपगत्वा विषयीचे दीर्घ काळापासून चालत आलेले गैरसमज दूर होत आहेत, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.