नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आज फाल्गुन पौर्णिमा अर्थात होळी पौर्णिमा. देशभरात आज पारंपारिक पद्धतीनं होलिका दहन केलं जातं.
राज्यात होळीच्या दुसऱ्या दिवशी धुळवड साजरी केली जाते. कोकणात होळीचा सण मोठ्या उत्साहानं साजरा केला जातो. रत्नागिरी जिल्ह्यात सुमारे ४ हजार २४६ ठिकाणी, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात बाराशे ८५ ठिकाणी खासगी आणि सार्वजनिक होळ्या पेटणार असल्याची माहिती पोलीस प्रशासनानं दिली आहे.
होळीनिमित्त रत्नागिरी जिल्ह्यात जाण्यासाठी कोकण रेल्वेनं विशेष रेल्वेगाड्याही सोडल्या आहेत. दरम्यान महाराष्ट्रातल्या नांदेड शहरातल्या विज्ञान महाविद्यालयात परिसरातला कचरा जमा करून पर्यावरणपूरक होळी साजरी करण्यात आली.
मात्र यंदा कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर धुळवड साजरी करण्याबाबत लोकांना खबरदारी घेण्याचं आवाहन शासनानं केलं आहे.
अमरावती जिल्ह्यातल्या मेळघाटात आदिवासींचा सर्वात मोठा सण होळी असून त्याची जोरदार तयारी सुरू आहे. होळी पेटवल्यावर रात्रभर आदिवासी किनकी, ढोलकी आणि बासरीच्या तालावर नाचत असतात. नंतर नैसर्गिक रंग उधळून धूळवड साजरी केली जाते.
मेळघाटातल्या आदिवासींचा हा सर्वात मोठा सण मानला जातो. दरवर्षी होळीनिमित्त मेळघाटातल्या चारा, कोर या गावांमध्ये यात्राही भरली आहे.
नांदेड जिल्ह्यात सचखंड गुरूद्वारात आज होळीचा सण उत्साहात साजरा केला जात आहे. अखंड गुरूग्रंथ पठण करून सायंकाळी गुरूद्वारात होळी पेटवली जाते. देशविदेशातनं लाखो भाविक होळीसाठी नांदेडमध्ये आले आहेत.
जालना शहरात आज धूलिवंदन हत्ती रिसाला उत्सव समितीच्या वतीनं फुलांची उधळण करत होळी साजरी केली. नंदूरबार जिल्ह्यात होळी भोगऱ्या धडगावमध्ये मोठ्या उत्साहात साजरा झाला. भोगऱ्या बाजारात आदिवासी वाद्यांवर मिरवणूक काढून पारंपरिक पद्धतीनं भोगऱ्या साजरा झाला.