Site icon साप्ताहिक एकच ध्येय

एकम महोत्सवाच्या सांगता समारंभात दिव्यांग कारागीर व उद्योजकांना क्रिशन पाल गुर्जर यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान

आठवडाभर चाललेल्या एकम महोत्सवाची आज सांगता

नवी दिल्ली : नवी दिल्ली येथे आठवडाभर चाललेल्या एकम महोत्सव या प्रदर्शन व जत्रेत सहभागी झालेल्या दिव्यांग कारागीर तसेच उद्योजकांना सामाजिक न्याय व सक्षमीकरण राज्यमंत्री क्रिशन पाल गुर्जर यांनी आज पुरस्कार प्रदान केले. हा महोत्सव सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालयाच्या अंतर्गत राष्ट्रीय अपंग आर्थिक विकास महामंडळाने आयोजित केला होता.

केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्री थावरचंद गेहलोत, केंद्रीय रस्ते वाहतूक तसेच सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय महिला व बालविकास मंत्री स्मृती इराणी यांच्या उपस्थितीत 2 मार्च 2020 रोजी या महोत्सवाचे उद्‌घाटन झाले होते. सामाजिक न्याय व सक्षमीकरण राज्यमंत्री क्रिशन पाल गुर्जर आणि रतनलाल कटारिया हे देखील त्यावेळी उपस्थित होते.

दिव्यांग उद्योजक व दिव्यांगांसाठी काम करणाऱ्या संस्थांकरिता इतक्या मोठ्या प्रमाणात प्रदर्शन आयोजित होण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे, गुर्जर यांनी यावेळी सांगितले. 17 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधून आलेल्या 82 दिव्यांग कारागीर तसेच उद्योजकांनी आपली उत्पादने या एकम महोत्सवात प्रदर्शित केली होती. संध्याकाळच्या सांस्कृतिक कार्यक्रमातून एकम महोत्सवाने दिव्यांग कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करुन दिले होते. जम्मू – कश्मीरपासून, पुद्दूचेरीपर्यंत आणि नागालँडपासून गुजरातपर्यंतच्या भागांतून दिव्यांग उद्योजक तसेच  कारागीरांना या महोत्सवासाठी आमंत्रित केले गेले होते. जम्मू – काश्मीर तसेच ईशान्य भारतातून अनेक हस्तकला, हातमाग कापडे, भरतकाम केलेल्या वस्तू तसेच सुका मेवा या महोत्सवात प्रदर्शित करण्यात आला होता.

या महोत्सवात 12 संस्थांच्यावतीने हातमाग, भरतकाम, रंगलेपन, गव्हांकुरांनी केलेले रंगलेपन इत्यादी प्रात्यक्षिके दाखवली गेली.

हरियाणातून आलेले प्रसिद्ध दिव्यांग ज्योतिषविशारद तसेच मसाज करणाऱ्या दृष्टीहीन कारागिरांकडून अनेक नागरिकांनी सेवांचा लाभ घेतला.

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त 8 मार्च रोजी हौस-खास इथल्या राष्ट्रीय अंध संघटनेने (NAB) दृष्टीहीन महिलांमध्ये स्तनकर्करोगाचा प्रादुर्भाव शोधण्यासाठी मोफत शिबिराचे आयोजन केले होते. दृष्टीहीन महिलांनी ताजे खाद्यपदार्थ तयार करून विक्रीसाठी दुकाने लावली होती. महोत्सवात सहभागी झालेल्या दिव्यांगांसाठी तसेच इतर ग्राहकांसाठी रोटरी क्लबने सवलतीच्या दरात (रु. 10/-) खाद्यपदार्थ विक्रीची केंद्रे सुरु ठेवली होती.

राष्ट्रीय अपंग आर्थिक विकास महामंडळातर्फे सर्व दिव्यांग सहभागींना त्यांच्या विक्रीच्या नोंदी ठेवण्यासाठी पावती पुस्तके दिली होती. महोत्सवादरम्यान झालेला अवकाळी पाऊस तसेच करोना विषाणू प्रतिबंधासाठी आरोग्य विभागाने सूचना जारी केल्यामुळे भेट देणाऱ्या नागरिकांची संख्या कमी होऊन देखील विक्रीचा आकडा 8 लाख रुपयांवर गेला, असे पावती पुस्तकांच्या नोंदीवरुन दिसून आले आहे.

राष्ट्रीय अपंग आर्थिक विकास महामंडळ दिव्यांगजनांच्या सक्षमीकरणासाठी, आर्थिक पुनर्वसनासाठी, तसेच त्यांच्या उद्योगांच्या विकासासाठी अनेक कौशल्य विकास कार्यक्रम आयोजित करते.

Exit mobile version