Site icon साप्ताहिक एकच ध्येय

नागपूर शहरातील तीन पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई – गृह राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील

मुंबई : तरुणीला मानसिक त्रास देणे, दारु तस्करी, कारवाई न करण्यासाठी लाचेची मागणी अशा नागपूरमधील वेगवेगळ्या तीन घटनांमध्ये सहभागी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यासह त्यातील दोघांवर बडतर्फीची तर एकावर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याची माहिती गृह राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी विधानसभेत निवेदनाद्वारे दिली.

नागपूर शहरातील कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने सदस्य श्री. विजय वडेट्टीवार यांनी नियम 97 अन्वये दिलेल्या स्थगन प्रस्तावाच्या सूचनेच्या अनुषंगाने डॉ. पाटील यांनी सभागृहात हे निवेदन केले. नागपूरमधील नवीन बाबुलखेडा परिसरात झालेल्या हत्या प्रकरणात मध्यस्थी करणाऱ्या मुलाच्या बहिणीला वारंवार वेगवेगळ्या बहाण्याने पोलीस उपनिरीक्षक संजय टेमगिरे यांनी पोलीस ठाण्यात व इतरत्र बोलावून लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करुन मानसिक त्रास दिला. तरुणीने याबाबत दिलेल्या तक्रारीवरुन श्री. टेमगिरे यांच्याविरुद्ध अजनी पोलीस ठाण्यात भा.दं.वि. कलम 354, 354(ड) तसेच अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यामधील कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच श्री. टेमगिरे यांना दि. 19 जून 2019 रोजी सेवेतून निलंबित केले आहे.

सीताबर्डी वाहतूक पोलीस विभागातील पोलीस  शिपाई सचिन हांडे याचा दारु तस्करीत  सक्रिय सहभाग आढळून आल्याने भा.दं.वि. कलम 311(2)(बी) अन्वये सेवेतून बडतर्फ  करण्यात आले आहे. प्रतापनगर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक श्री. घोडाम आणि सूरज लोलगे ही खासगी व्यक्ती यांनी लाईफ केअर क्लिनिक येथील डॉक्टरांकडून त्यांच्याविरुद्ध कारवाई न करण्यासाठी लाचेची मागणी केली होती. लाचलुचपत प्रतिबंधक  विभागाने सापळा करुन श्री. घोडाम यांना लाच घेताना अटक केली. त्यानुसार श्री. घोडाम आणि लोलगे यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला असून श्री. घोडाम यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे, असेही डॉ. रणजीत पाटील यांनी सांगितले.

Exit mobile version