नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मध्यप्रदेशातल्या वेगवान राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ काँग्रेस नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी आज काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.
१८ वर्ष काँग्रेसमधे राहिल्यावर आता पुढील मार्ग निवडण्याची वेळ आली आहे, असं सिंदीया यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना पाठवलेल्या राजीनामा पत्रात म्हटलं आहे. तत्पूर्वी शिंदे यांनी आज नवी दिल्लीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. दरम्यान पक्षविरोधी कारवाया केल्याबद्दल काँग्रेसनं ज्योतिरादित्य शिंदे यांना पक्षातून निलंबित केलं आहे.
मध्यप्रदेशात सत्ताधारी काँग्रेसच्या किमान १७ आमदारांचा संपर्क तुटल्यानं राज्यातलं काँग्रेस सरकार पेचप्रसंगात अडकलं आहे. बेपत्ता झालेल्या आमदारांमध्ये पाच मंत्र्यांचा समावेश असून, ते सर्वजण ज्योतिरादित्य शिंदे यांचे समर्थक आहेत. २३० सदस्यांच्या मध्यप्रदेश विधानसभेत काँग्रेसचे ११४ आमदार आणि विरोधी भाजपचे १०७ सदस्य आहेत.
चार अपक्ष, बसपाचे दोन आणि समाजवादी पक्षाच्या एका आमदारांनं काँग्रेसच्या नेतृत्वाखालील सरकारला पाठिंबा दिला होता.दरम्यान, काँग्रेस आणि भाजपा या दोन्ही पक्षांनी आज आपापल्या आमदारांची बैठक बोलवली आहे. मध्यप्रदेश विधानसभेच्या अर्थसंकल्प अधिवेशन येत्या १६ तारखेला सुरु होणार आहे, तर राज्यसभेसाठीही मध्यप्रदेशातून तीन जागा निवडून द्यायच्या आहेत.