Site icon साप्ताहिक एकच ध्येय

जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी घेतला कोरोनाच्या प्रतिबंधाबाबत आढावा

पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सर्व उपविभागीय अधिकारी, आरोग्य विभागाचे अधिकारी, महानगरपालिकेचे अधिकारी खाजगी रूग्णालयांचे प्रमुख यांच्याशी संवाद साधला. कोरोना संदर्भात नागरिकांनी आवश्यक ती घ्यावयाची खबरदारी व त्यासंदर्भात करावयाची कार्यवाही आणी उपाययोजनांबाबतचा आढावा घेण्यात आला.

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीस महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रूबल अग्रवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, अपर जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी राम म्हणाले, कोरोना रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची माहिती काढण्यासाठी तसेच अन्य काळजी घेण्यासाठी पथकांची निर्मिती करण्यात आली असून यामध्ये महसूल, आरोग्य, पोलिस आणि महानगरपालिकांचे अधिकारी आणि कर्मचारी यांचा समावेश करण्यात आलेला आहे. या पथकाद्वारे कोरोनाचे रुग्ण ज्या परिसरामध्ये गेले असतील त्या ठिकाणी कोरोना बाधित अथवा संशयित व्यक्ती आढळून येत असल्यास त्याची खातरजमा करण्यात येईल तसेच यासाठी तातडीने रुग्णवाहिकेची व्यवस्थाही करण्यात आली आहे.  कोरोना प्रतिबंधाबाबत उपाययोजनासंदर्भात प्रत्येक अधिका-यांने समन्वय ठेवून काम करावे,

तसेच नागरिकांनी दक्ष राहून खबरदारी घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी राम यांनी केले आहे. जिल्हाधिकारी राम यांनी खासगी रुग्णालयांच्या प्रमुख  डॉक्टरांशी संवाद साधून उपलब्ध सुविधेचाही आढावा घेतला.

Exit mobile version